सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने क्रिकेट सामने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. उर्वरित दोन सामने बीसीसीआयने खबरदारीचा उपाय म्हणून रद्द केला. मात्र या सर्व गडबडीत, एक महत्वाची गोष्ट चाहत्यांच्या नजरेआड झाली. बीसीसीआयने माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांना आपल्या समालोचकांच्या यादीतून वगळलं आहे. मुंबई मिरर या वृत्तपत्राने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
धर्मशाळा वन-डे सामन्याकरता, सुनिल गावसकर, लक्ष्मण शिवरामकृष्णन, मुरली कार्तिक हे माजी खेळाडू समालोचनासाठी हजर होते, मात्र यामध्ये संजय मांजरेकर कुठेही दिसले नाहीत. निवृत्तीनंतर मांजरेकर सातत्याने समालोचन करत आले आहेत. मात्र बीसीसीआयमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी आयपीएल स्पर्धेतही मांजरेकर यांना वगळलं जाण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयमधील अधिकाऱ्यांनी यावर बोलण्यास नकार दिला असला, तरीही सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआय मांजरेकर यांच्या कामावर खुश नसल्याचं कळतंय. त्यामुळे आगामी आयपीएलमध्येही मांजरेकरांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता आहे. संजय मांजरेकर हे अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे गोत्यात येत असतात. काही दिवसांपूर्वी रविंद्र जाडेजा आणि हर्षा भोगले यांच्याशीही संजय मांजरेकर यांचं वाकयुद्ध रंगलं होतं. ज्यासाठी मांजरेकर यांना सोशल मीडियावर चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला होता.