भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निलंबित करण्यात आलेले आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी राजस्थान क्रिकेट असोसिएशनवर (आरसीए) परतण्याच्या मार्गावर असल्यामुळे या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचे ठरवले आहे. या गोंधळाच्या परिस्थितीत आरसीएच्या निवडणुकीला आव्हान देण्यासाठी तसेच त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी बीसीसीआयने हा ‘मध्यस्थी’चा मार्ग पत्करला आहे.
मोदींच्या पुनरागमनाविषयी चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बीसीसीआयच्या कार्यकारी समितीच्या तातडीच्या बैठकीत मोदींसह अनेक विषयांवर चर्चा झाली. मोदींवर कोणती कारवाई करावी, याबाबत सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल करण्यात येणार आहे. ‘‘रुंगटा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष याचिकेत राजस्थानमधील क्रिकेट कायद्याला आव्हान देण्यात आले असून या प्रकरणी बीसीसीआय लक्ष घालणार आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाणार असले तरी गुन्हेगारी व्यक्तींवर कडक कारवाई केली जाईल. तसेच राजस्थानमधील क्रिकेटच्या प्रतिमेला कोणताही धक्का पोहोचू नये, याची काळजी घेतली जाईल,’’ असे बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी सांगितले.
‘‘भ्रष्टाचार आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख रवी सवानी यांचे सादरीकरण तसेच आयकर आणि अन्य महत्त्वाच्या मुद्दय़ांवर कार्यकारी समितीचे सदस्य आणि अन्य निमंत्रित सदस्यांमध्ये चर्चा झाली,’’ असेही त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली १९ डिसेंबर रोजी झालेल्या आरसीएच्या निवडणुकीत मोदी हे अध्यक्षपदासाठी रिंगणात होते. या निवडणुकीचा निकाल ६ जानेवारी रोजी लागण्याची शक्यता असून त्याआधी बीसीसीआयने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
गंगानगर जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष आणि मोदींचे वकील मेहमूद अब्दी हेसुद्धा या बैठकीला उपस्थित होते. पण बीसीसीआयच्या कार्यकारी समितीचे सदस्यत्व राजस्थानकडे नसल्यामुळे अब्दी यांना या बैठकीला उपस्थित राहण्याची परवानगी कुणी दिली, यावरूनही या बैठकीत खडाजंगी झाली. अब्दी यांची या वेळी सुरक्षारक्षकांशी बाचाबाची झाली. याबाबत आरसीएचे सचिव के. के. शर्मा यांनी पटेल यांना ई-मेल पाठवून माफी मागितली आहे. ‘‘आपण आरसीएची बाजू मांडण्यासाठी गेलो आहोत, हे अब्दी यांनी नम्रपणे सांगायला हवे होते. पण अब्दी यांनी हुज्जत घातल्यामुळे त्यांच्या वतीने मी माफी मागतो,’’ असे शर्मा यांनी म्हटले आहे.
मोदींप्रकरणी श्रीनिवासन निर्णय घेऊ शकत नाहीत -अब्दी
आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी आणि बीसीसीआयचे अध्यक्ष यांच्यात कट्टर वैर असल्यामुळे श्रीनिवासन मोदी यांच्या पुनरागमनाच्या बाबतीत योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत, असे मोदींचे वकील मेहमूद अब्दी यांना वाटते. ‘‘मोदींशी शत्रूत्व असल्यामुळे श्रीनिवासन यांनी आरसीएच्या बाबतीत निर्णय घेताना दूर राहावे. मोदींच्या बाबतीत ते पारदर्शकपणे निर्णय घेऊ शकत नाहीत. आरसीएच्या निवडणुकीत उभे राहण्यासाठी मोदी यांना परवानगी देतानाही श्रीनिवासन यांनी आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला होता,’’ असे अब्दी म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा