भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) सध्या क्रिकेटमधील एक नियम बदलण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआयच्या या नव्या नियमामुळे क्रिकेटला एक वेगळं वळण लागण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय. बिग बॅश लीगच्या धर्तीवर, बीसीसीआय देखील ११ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली टी२० चषकामध्ये ‘इम्पॅक्ट प्लेयर’ हा नवीन नियम लागू करणार आहे. ह्या नवीन नियमाची अंमलबजावणी इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील आवृत्तीतही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या नियमानुसार, सामन्यादरम्यान अंतिम ११ मध्ये ११ ऐवजी १५ खेळाडू पात्र असतील. दोन्ही संघाच्या कर्णधारांना चार अतिरिक्त खेळाडू वापरता येतील.
नवीन नियमानुसार, संघ एखाद्या सामन्यादरम्यान त्यांच्या अंतिम अकरा मधील एका सदस्याची जागा घेऊ शकतात, त्यांना ते जिथे उपयुक्त वाटेल त्याठिकाणी खेळाडूंची अदला बदली करू शकतात. संघ आणि खेळाडूंना नवीन नियमाची सवय लागावी यासाठी बीसीसीआय राज्य क्रिकेटमध्ये प्रथम अंमलबजावणी करणार आहे.
हेही वाचा : मी नेहमी सकारात्मक विचार करतो, टी२० विश्वचषक संघातून वगळल्यानंतर संजू सॅमसनची पहिली प्रतिक्रया
इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार बीसीसीआयने सर्व राज्यांच्या क्रिकेट संघटनांना परिपत्रक पाठवले असून त्यात ते म्हणतात, “टी२० क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेसाठी हे अत्यावश्यक आहे की आम्ही काहीतरी नवीन स्वरूपाचे बदल यामध्ये करावेत. अशाप्रकारच्या बदलांकडे आम्ही सतत लक्ष ठेवून असतो. जेणेकरून हे स्वरूप अधिक आकर्षक होईल आणि केवळ आमच्या दर्शकांसाठीच नाही तर धोरणात्मक दृष्टिकोनातून सहभागी संघांसाठी देखील मनोरंजक असेल.”
‘इम्पॅक्ट प्लेयर’नियम आहे तरी कसा
‘इम्पॅक्ट प्लेयर नियमानुसार, सामन्यादरम्यान अंतिम अकरा मधील कोणताही एक खेळाडू बदलता येऊ शकतो. कर्णधाराला नाणेफेकीच्या वेळी ४ अतिरिक्त खेळाडूची नावे द्यावी लागतील. या चार खेळाडूंपैकी कोणत्याही एका खेळाडूला सामना खेळता येऊ शकतो. बीसीसीआय ने सर्व राज्यातील क्रिकेट संघांना नोटीस पाठवली आहे.
नियमानुसार, इम्पॅक्ट प्लेयर या नियमाचा उपयोग दोन्ही संघांना फक्त एकदाच करता येणार आहे. संघाचा कर्णधार, संघाचे प्रशिक्षक किंवा संघ मॅनेजर यांना मैदानातील किंवा मैदानाबाहेरील चौथ्या पंचाकडे इम्पॅक्ट प्लेयरची नावं सोपवावी लागतील. जो खेळाडू बाहेर होईल, त्याला उर्वरित चालू सामन्यात संधी दिली जाणार नाही. बीसीसीआय या नियमाबाबतील अधिकची घोषणा येत्या काही दिवसात करण्याची शक्यता आहे. याबाबत बीसीसीआयच्या परिपत्रकात नमूद केले आहे.
हेही वाचा : विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची खडतर कसोटी, या पाच खेळाडूंपासून भारताने राहावे सावध
बिग बॅश लीगमध्ये देखील असाच नियम
ऑस्ट्रेलियामधील प्रसिद्ध बिग बॅश स्पर्धेत देखील असाच नियम लागू आहे. दोन्ही संघाला पहिल्या डावाच्या १० व्या षटकाआधी १२ वा किंवा १३ वा खेळाडू वापरण्याची संधी असते. मात्र, बीसीसीआयच्या नियमानुसार १४ व्या षटकाआधी ‘इम्पॅक्ट प्लेयर’ सामन्यामध्ये वापरता येणार आहे.