ज्या मुंबईत सचिन तेंडुलकरने क्रिकेटचे धडे गिरवले, त्या मुंबईतच त्याचा कारकिर्दीतील अखेरचा सामना होणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. ही कसोटी मुंबईत होणार की नाही, याविषयी उलटसुलट चर्चाना उधाण आले होते. मात्र माझ्या आईला हा सामना पाहायचा आहे, त्यामुळे ही कसोटी मुंबईत व्हावी, अशी विनंती खुद्द सचिनने बीसीसीआयला केली. २४ वर्षे क्रिकेटची अव्याहत सेवा करणाऱ्या मास्टर ब्लास्टरच्या विनंतीला बीसीसीआयने तात्काळ होकार दिला आणि मुंबईतच हा महानायक क्रिकेटला अलविदा करणार यावर शिक्कामोर्तब झाले.
मुंबईत कसोटी वानखेडे स्टेडिमयवर का ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सचिनसाठी महत्त्वाचा मुद्दा नाही. मैदान कोणतेही असो, कसोटी मुंबईत असेल तर आईला ही कसोटी ‘याचि देहा याचि डोळा’ पाहता येईल ही सचिनची भूमिका होती. ‘माझ्या आईला माझी शेवटची खेळी पाहायची आहे. याआधी तिने कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सामना मैदानात बसून पाहिलेला नाही. माझ्या हजारो चाहत्यांच्या साक्षीने तिला हा सामना अनुभवायचा आहे. यासाठी माझी शेवटची कसोटी मुंबईत व्हावी’, अशी विनंती सचिनने बीसीसीआयला केली होती.
१४ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत हा सामना होणार आहे. कुटुंबीयांच्या भरीव पाठिंब्यामुळेच सचिनने क्रिकेटमध्ये मानाची शिखरे पादाक्रांत केली. कारकिर्दीत चढउताराच्या क्षणी भक्कमपणे पाठीशी उभ्या राहणाऱ्या आईला आपल्या लेकाचा शेवटचा सामना प्रत्यक्ष पाहायला मिळावा यासाठी सचिनने विनंती केली. सचिन खेळत असताना मला दडपण येते. मी निराश झाले तर त्याच्या खेळावर परिणाम व्हायला नको असे मला वाटते. म्हणून दुसऱ्या दिवशी मी सामन्याची क्षणचित्रे पाहते, असे सचिनच्या आईने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा