दक्षिण आफ्रिकेत झालेल्या कसोटी पराभवानंतर आता बीसीसीआयला जाग आलेली आहे. बीसीसीआयचा प्रशासकीय कारभार पाहणारी, क्रिकेट प्रशासकीय समिती भारताच्या आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाची चाचपणी करणार असल्याचं समजतं आहे. आफ्रिका दौरा संपल्यावर भारतीय संघ मायदेशात परतल्यानंतर भारतीय संघाच्या कामगिरीचा सखोल अभ्यास केला जाणार आहे.

अवश्य वाचा – विराटच्या कर्णधारपदाच्या क्षमतेवर ग्रॅम स्मिथचं प्रश्नचिन्ह

केप टाऊन पाठोपाठ सेंच्युरिअन कसोटीत भारताला आफ्रिकेविरुद्ध पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय संघाला कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. “भारतीय संघ व्यवस्थापकाकडून अहवाल आल्यानंतर भारतीय संघाच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल. दौरा सुरु असताना प्रशासकीय समिती कोणतही पाऊल उचलण्याच्या तयारीत नसल्याचं,” बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितलं.

अवश्य वाचा – भक्त मोदींची करतात त्यापेक्षा जास्त हाजी हाजी BCCI कोहलीची करते – रामचंद्र गुहा

क्रिकेट प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय, सदस्य डायना एडुलजी आणि बीसीसीआयचे विशेष कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्यात महत्वाची बैठक झाली. या बैठकीत बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सी.के.खन्ना आणि सचिव अमिताभ चौधरी यांना या बैठकीला बोलवण्यात आलेलं नव्हतं. कसोटी मालिका गमावल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वावर अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.

अनेक माजी खेळाडूंनी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कोणत्याही पूर्वतयारीशिवाय जाण्याचा निर्णय चुकीचा असल्याचं बोलून दाखवलं. काही खेळाडूंनी श्रीलंकेविरुद्ध भारताने खेळलेली मालिका गरजेची नसल्याचं बोलून दाखवलं होतं. याचसोबत भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही आफ्रिका दौऱ्याआधी किमान १० दिवस सरावासाठी मिळणं गरजेचं असल्याचं मान्य केलं होतं. क्रिकेट प्रशासकीय समितीची पुढची बैठक ही २९ जानेवारीरोजी होणार आहे.

अवश्य वाचा – मुख्य प्रशिक्षक शास्त्री यांची पश्चातबुद्धी

Story img Loader