चेन्नई सुपरकिंग्जच्या संघातील दोन खेळाडू (दिपक चहर आणि ऋतुराज गायकवाड) आणि सपोर्ट स्टाफमधील १२ सदस्यांना करोनाची लागण झाल्यानंतर बीसीसीआयला चांगलाच धक्का बसला आहे. १९ सप्टेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार असली तरीही अद्याप बीसीसीआयने वेळापत्रकाची अधिकृत घोषणा केलेली नाही. युएईला रवाना होण्याआधी चेन्नई सुपरकिंग्जने आपल्या खेळाडूंसाठी १५ ते २० ऑगस्टदरम्यान चेन्नईत ट्रेनिंग कँपचं आयोजन केलं होतं. महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना, पियुष चावला, केदार जाधव, ऋतुराज गायकवाड, दीपक चहर यासारखे खेळाडू या कँपमध्ये सहभागी झाले होते.
अवश्य वाचा – IPL 2020 : CSK च्या आणखी एका खेळाडूला करोनाची लागण, संघाच्या अडचणींमध्ये भर
चेन्नईचा अपवाद वगळता एकाही संघाने भारतात कँपचं आयोजन केलं नव्हतं. सूत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयही चेन्नईच्या या कँपच्या विरोधात होतं. बीसीसीआयमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी युएईला रवाना होण्याआधी भारतात अशा पद्दतीने कँपचं आयोजन करणं धोकादायक ठरु शकतं अशी सूचनाही CSK व्यवस्थापनाला केली होती. हा कँप रद्द करावा अशी सूचना असतानाही CSK संघ व्यवस्थापनाने कँपचं आयोजन केलं. मात्र बरेच महिने क्रिकेट मैदानापासून दुरावलेल्या खेळाडूंसाठी या कँपची गरज असल्याचं म्हणत CSK ने या कँपचं आयोजन केलं.
अवश्य वाचा – Viral Video : CSK च्या खेळाडूंकडून BCCI नियमांचा भंग?? सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा…
चेन्नईवरुन निघताना प्रत्येक खेळाडूची करोना चाचणी करण्यात आली होती, ज्याचा अहवाल निगेटीव्ह आला होता. दुबईत दाखल झाल्यानंतर अनेक गोष्टींच्या संपर्कात आल्याची शक्यता असल्यामुळे खेळाडूंना करोनाची लागण झाली असू शकते असं CSK प्रशासनाचं म्हणणं आहे. परंतू भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता कँपचं आयोजन करणं धोकादायक ठरु शकतं अशी सूचना देऊनही त्याचं पालन न झाल्याने बीसीसीआयचे अधिकारी नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान करोनाची लागण झालेल्या खेळाडूंना क्वारंटाइन करण्यात आलेलं असून त्यांची तब्येत स्थिर असल्याचं बोललं जातंय.
अवश्य वाचा – IPL 2020 मधून सुरेश रैनाची माघार