गेल्या काही आठवड्यांपासून विराट कोहली चर्चेत आहे. टी-२० फॉरमॅटमधील कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा त्याचा निर्णय, एकदिवसीय कर्णधारपदावरून त्याची हकालपट्टी आणि त्यानंतर त्याची पत्रकार परिषद या सर्व गोष्टींमुळे विराट चर्चेत राहिला. याबद्दल बरेच काही लिहिले आणि सांगितले गेले, अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. आता एका मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे, की विराटला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्याचा मुद्दा बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात चार महिन्यांपूर्वीपासूनच सुरू होता.
विराट कोहलीने त्याच्यावरील कामाचा ताण लक्षात घेऊन टी-२० कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याने कसोटी आणि एकदिवसीय संघांचे नेतृत्व सुरू ठेवण्याचा आपला इरादा स्पष्ट केला. दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी कसोटी संघ जाहीर करताना बीसीसीआयने रोहित शर्माची वनडे संघाच्या कर्णधारपदी नियुक्तीही केली. नंतर बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला, ”कोहलीने बीसीसीआयची टी-२० कर्णधारपद सोडू नये अशी विनंती नाकारली होती.”
त्यानंतर विराटने पत्रकार परिषद घेऊन गांगुलीच्या त्या दाव्यांचे जाहीरपणे खंडन केले. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी पत्रकार परिषदेत कोहली म्हणाला, ”कसोटी मालिकेसाठी ८ डिसेंबर रोजी निवड बैठकीच्या दीड तास आधी माझ्याशी संपर्क साधण्यात आला. मी टी-२० कर्णधारपदाचा निर्णय जाहीर केल्यापासून ८ डिसेंबरपर्यंत माझ्याशी कोणताही संवाद झाला नाही.”
हेही वाचा – भारत-आफ्रिका कसोटी मालिका : वेगवान गोलंदाजांमुळे वर्चस्व गाजवू -पुजारा
क्रिकट्रॅकरच्या रिपोर्टनुसार, असे संकेत मिळाले आहेत, की विराटला वनडे कर्णधारपदावरून हटवण्याचा विचार बोर्ड अधिकाऱ्यांच्या मनात आधीपासूनच होता. त्यामुळे बोर्डाने एकापाठोपाठ एक असे धक्कादायक निर्णय घेतल्याचेही अहवालात म्हटले आहे. विराटच्या नेतृत्वाखाली भारताला आता दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेत रोहित शर्माला पहिला उपकर्णधार बनवण्यात आले होते, पण त्याच्या दुखापतीमुळे ही जबाबदारी केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे.