India Will Not Play Cricket With Pakistan: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध कोणतेही द्विपक्षीय क्रिकेट खेळणार नाही, असे स्पष्ट केले आहे. २०१२-१३ मध्ये पाकिस्तान मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतात आला होता तेव्हापासून भारत आणि पाकिस्तान यांच्या द्विपक्षीय मालिका झालेली नाही. तर, २००८ मध्ये भारतीय संघ शेवटचा पाकिस्तानला क्रिकेट मालिका खेळण्यासाठी गेला होता.
तेव्हापासून भारत आणि पाकिस्तान फक्त आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येच ऐकमेकांविरोधात खेळतात. २०२३ मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघ एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतात आला होता. पण, काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी भारताने पाकिस्तानला जाणे टाळले होते. भारताचे सर्व सामने आणि अंतिम सामना दुबईमध्ये झाले होते.
“आम्ही पीडितांसोबत आहोत आणि आम्ही या हल्ल्याचा निषेध करतो. आपल्या सरकारची जी भूमिका आहे, त्या भूमिकेशी आम्ही सहमत आहे. सरकारच्या भूमिकेमुळे आम्ही पाकिस्तानसोबत द्विपक्षीय क्रिकेट मालिकेत खेळत नाही. आणि पुढेही आम्ही पाकिस्तानबरोबर द्विपक्षीय क्रिकेट मालिकेत खेळणार नाही. पण जेव्हा आयसीसी स्पर्धेचा प्रश्न येतो तेव्हा आयसीसीमुळे आम्हाला खेळावे लागले”, असे राजीव शुक्ला म्हणाले. याबाबत स्पोर्ट्स तकने वृत्त दिले आहे.
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनीही या हल्ल्याबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले, “पहलगाम येथे काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप जीव गमावल्यामुळे क्रिकेट क्षेत्रालाही दुःख झाले आहे. बीसीसीआयच्या वतीने, या भयानक आणि भ्याड कृत्याचा तीव्र शब्दात निषेध करतो,” असे सैकिया म्हणाले.
इंडियन प्रीमियर लीगच्या सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात बीसीसीआयच्यावतीने पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याचबरोबर बीसीसीआयने हा सामना कोणत्याही धामधुमीशिवाय आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. सामन्यात कोणतेही चीअरलीडर परफॉर्मन्स, आतषबाजी किंवा डीजे कार्यक्रम नव्हते.
दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद हाफिजने भारतातील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत दुःख व्यक्त केले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांबाबत शोक व्यक्त करणारा हाफिज हा आतापर्यंतचा एकमेव पाकिस्तानी क्रिकेटपटू आहे. त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही पाकिस्तानी खेळाडूने या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया दिली नाही.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममधील बैसरन खोऱ्यात पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान २६ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २५ भारतीय तर एक नेपाळी पर्यटक होता.