महिन्याभरापूर्वी नवी दिल्लीत आयोजित केलेली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कार्यकारिणी समितीची बैठक तांत्रिक कारणास्तव रद्दबातल ठरवण्यात आली होती. परंतु आता येत्या रविवारी मात्र बीसीसीआयच्या कार्यकारिणीची बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
‘‘कोलकाता येथे १ सप्टेंबरला बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीची बैठक होणार आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी होणारी ही मंडळाची अखेरची कार्यकारिणी समितीची बैठक असेल,’’ असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.
या बैठकीमध्ये वार्षिक अहवाल आणि ताळेबंद कार्यकारिणी समितीसमोर सादर करण्यात येणार आहे. बीसीसीआयला मागील आर्थिक वर्षांत ३५० कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. संलग्न संघटनांमध्ये या पैशांच्या वाटपाबाबत निर्णय घेण्यात येईल. याचप्रमाणे बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची तारीख आणि स्थळ हेसुद्धा या बैठकीमध्ये निश्चित करण्यात येईल.
२ ऑगस्टला आयपीएल प्रशासकीय समितीची बैठक झाली होती. याच दिवशी बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीची बैठक होणार होती. परंतु बीसीसीआयने अत्यंत कमी दिवसांमध्ये सदस्यांना पाठविलेल्या परिपत्रकामध्ये ‘तातडीची कार्यकारिणी समितीची बैठक’ असा उल्लेख केला नव्हता. त्यामुळे ती बैठक रद्द करावी लागली होती.
मुंबई उच्च न्यायालयाने बीसीसीआयने नेमलेल्या आयपीएल चौकशी समितीला ‘बेकायदेशीर आणि घटनाबाह्य’ ठरवले होते. या निर्णयाविरोधात बीसीसीआयने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. या संदर्भातील पुढील सुनावणी २९ ऑगस्टला आहे. आयपीएल चौकशी समिती जोवर आपले कार्य पूर्ण करणार नाही, तोवर एन. श्रीनिवासन बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर पुन्हा रुजू होऊ शकणार नाहीत.
येत्या रविवारी बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीची बैठक
महिन्याभरापूर्वी नवी दिल्लीत आयोजित केलेली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कार्यकारिणी समितीची बैठक तांत्रिक कारणास्तव रद्दबातल ठरवण्यात आली होती.
First published on: 28-08-2013 at 05:27 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci working committee to meet in kolkata