* दिल्ली संघटनेला बीसीसीआयचे पत्र * विदर्भाचे खेळाडू व प्रशिक्षकांशी चर्चा
फिरोजशाह कोटला स्टेडियमवरील रणजी सामन्यादरम्यान विदर्भाच्या काही क्रिकेटपटूंना माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनशी संवाद साधण्याची परवानगी देऊन दिल्ली क्रिकेट असोसिएशनने लाचलुचपत प्रतिबंध नियमांचे उल्लंघन केले आहे, अशा आशयाचे पत्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पाठवले आहे.

दिल्ली-विदर्भ रणजी सामन्यासाठी दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष चेतन चौहान यांनी अझरुद्दीनला आमंत्रित केले होते. या सामन्यादरम्यान विदर्भचे क्रिकेटपटू वसिम जाफर आणि एस. बद्रिनाथ यांच्यासह प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी अझरुद्दीनशी चर्चा केली होती.

२००० मध्ये मॅच-फिक्सिंग प्रकरणात दोषी सापडलेल्या अझरुद्दीनवरील बंदी अद्याप बीसीसीआयने उठवलेली नाही. काही तरी गोंधळ झाला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून चौहान यांनी बीसीसीआयकडून पत्र आल्याची कबुली दिली.

‘‘खेळाडू आणि सामनाधिकाऱ्यांच्या परिसरात (पीएमओए) विदर्भाच्या खेळाडूंनी अझरुद्दीनशी कसा काय संवाद साधला, अशी विचारणा बीसीसीआयने या पत्राद्वारे केली आहे. या ठिकाणी विनय लांबा आणि हरी गिडवाणी हे निवड समिती सदस्य तसेच दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी बसले होते. अझरसुद्धा याच ठिकाणी बसला होता. परंतु खेळाडूंनी अझरशी संवाद साधू नये, असे जर त्यांचे म्हणणे असेल, तर यापुढे आम्ही ही काळजी घेऊ,’’ असे चौहान यांनी सांगितले.

लाचलुचपत प्रतिबंध अधिकाऱ्यांनीही अझरबाबतची ही घटना सामनाधिकारी राजेंद्र जडेजा यांच्या निदर्शनास आणून दिली. अझरने विदर्भच्या क्रिकेटपटूंना फलंदाजीचे तांत्रिक मार्गदर्शन केले. त्यानंतर दिल्लीचे साहाय्यक प्रशिक्षक अमित भंडारी यांनी अझरची भेट घेतल्याचेही लाचलुचपत प्रतिबंध विभागाने टिपले आहे.

Story img Loader