BCCI Women’s Match Media Rights Free : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पुढील ५ वर्षांसाठी भारतात होणाऱ्या सामन्यांचे प्रसारण हक्क मिळविण्यासाठी, गेल्या आठवड्यात मीडिया हक्क निविदा जारी केल्या आहेत. यामध्ये आता बीसीसीआयकडून पुरुष संघाच्या सामन्यांचे हक्क मिळविणाऱ्या कंपनीला महिला क्रिकेट सामन्यांचे हक्क मोफत मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. महिलांच्या सामन्यांबाबत बोर्डाकडून कोणतेही वेगळे पॅकेज जाहीर करण्यात आलेले नाही.
बीसीसीआयने जारी केलेल्या निविदांमध्ये ब्रॉडकास्टर्सने पुरुष संघाचे हक्क विकत घेतल्यास महिला क्रिकेटचे मोफत प्रसारण करण्याचे अधिकार त्यांना दिले जातील. क्रिकबझच्या वृत्तानुसार, बोर्डाने निविदेत स्वतंत्रपणे महिला क्रिकेटचे प्रसारण हक्क विकत घेण्यासाठी कोणतेही पॅकेज घेतलेले नाही. त्यामुळे चाहत्यांना बीसीसीआयचा हा निर्णय अधिक चांगल्या प्रकारे दिसत नाही. आणि ते याला त्यांचा महिला क्रिकेटबाबतचा बेजबाबदार दृष्टिकोन मानत आहेत.
मंडळाने जारी केलेल्या निविदा सादर करण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट आहे. तसेच यावेळी लिलाव प्रक्रिया ई-ऑक्शनद्वारे केली जाणार आहे. बोर्डाने जारी केलेल्या निविदांमध्ये रणजी ट्रॉफी, इराणी चषक, दुलीप ट्रॉफी आणि इतर मोठ्या स्पर्धांसह देशांतर्गत क्रिकेटच्या अनेक मालिकांचा समावेश आहे.
हेही वाचा – Cristiano Ronaldo: सलग तिसऱ्या वर्षी ख्रिस्तियानो रोनाल्डो ठरला इन्स्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणारा व्यक्ती
डब्ल्यूपीएलच्या मीडिया हक्कांमधून ९०० कोटींहून अधिक कमावले होते –
या वर्षी महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) च्या पहिल्या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ६ संघांनी सहभाग घेतला होती. डब्ल्यूपीएलचे मीडिया हक्क बोर्डाने पुढील ५ वर्षांसाठी ९५१ कोटी रुपयांना विकले. गेल्या काही वर्षांत महिला संघाच्या सामन्यांबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे, याचा अंदाज स्पष्टपणे लावता येतो. अशा स्थितीत आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी स्वतंत्र निविदा न काढण्याच्या बोर्डाच्या निर्णयाने निश्चितच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या आगामी सामन्यांबद्दल बोलायचे, तर भारत न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, आयर्लंड आणि वेस्ट इंडिज दौऱ्यांचे यजमानपद भूषवणार आहे. पुढील तीन वर्षांत द्विपक्षीय मालिका होणार आहेत. बीसीसीआयने जारी केलेल्या निविदेत फक्त पुरुष क्रिकेटची बोली लावली जाईल. करारानुसार, ब्रॉडकास्टरला महिलांचे आंतरराष्ट्रीय सामने मोफत प्रसारित करण्याचाही अधिकार असेल. १५० पानांच्या आयटीटी म्हणजेच निविदेला आमंत्रण देण्यात आले आहे.