India tour of South Africa: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. अधिकृत अपडेट देताना बीसीसीआयने सांगितले की, “मोहम्मद शमीला कसोटी मालिकेतून वगळण्यात आले आहे, तर दीपक चाहरने एकदिवसीय मालिकेतून आपले नाव मागे घेतले आहे.” बीसीसीआयने दीपक चाहरच्या जागी बदली खेळाडू म्हणून युवा गोलंदाजाची घोषणा केली आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात उपलब्ध नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. बोर्डाने राहुल द्रविडबद्दलही सूचक विधान केले आहे. एका निवेदनात ते म्हणाले की, “द्रविड एकदिवसीय मालिकेत संघाबरोबर नसेल, तो कसोटीवर लक्ष केंद्रित करणार आहे.”
बीसीसीआयने दीपक चाहरच्या संदर्भात अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “दीपक चाहरने बोर्डाला कळवले आहे की कौटुंबिक वैद्यकीय कारणामुळे तो आगामी एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही. त्याच्या जागी निवड समितीने आकाश दीपची वन डे संघात निवड केली आहे.”
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतून मोहम्मद शमी बाहेर
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर पडला असून तो पूर्णपणे तंदुरुस्त नाही. “मोहम्मद शमी, ज्याचा कसोटी मालिकेतील सहभाग तंदुरुस्तीवर अवलंबून होता, त्याला बीसीसीआयच्या मेडिकल टीमने मंजुरी दिली नाही आणि वेगवान गोलंदाजाला दोन कसोटी सामन्यांमधून वगळण्यात आले आहे,” असे बीसीसीआयने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे.
श्रेयस अय्यरचा कसोटी संघात समावेश, राहुल द्रविड वन डे मालिकेत उपलब्ध नाही
भारतीय फलंदाज स्टार फलंदाज श्रेयस अय्यर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या १५ सदस्यीय एकदिवसीय संघात होता पण, काही कारणास्तव त्याने माघार घेतली आहे. बीसीसीआयने आपल्या निवेदनात पुढे उल्लेख करताना म्हटले आहे की, “तो दुसऱ्या आणि तिसऱ्या वन डेमध्ये उपलब्ध होऊ शकणार नाही.” बोर्डाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “१७ डिसेंबर रोजी जोहान्सबर्ग येथे पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर, श्रेयस अय्यर कसोटी मालिकेच्या तयारीसाठी कसोटी संघात सामील होईल. तो दुसऱ्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळणार नाही मात्र, आंतर-संघीय सराव सामन्यात भाग घेईल.”
भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, फलंदाजी प्रशिक्षक श्री. विक्रम राठौर, गोलंदाजी प्रशिक्षक श्री. पारस म्हांबरे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक श्री. टी. दिलीप हे कसोटी मालिकेयाआधी संघात सामील होतील आणि आंतर-संघीय सामना आणि कसोटी सामन्यांच्या तयारीचे निरीक्षण करतील. एकदिवसीय संघाला भारत अ कोचिंग स्टाफकडून मदत केली जाईल ज्यात फलंदाजी प्रशिक्षक श्री. सितांशु कोटक, गोलंदाजी प्रशिक्षक श्री राजीव दत्ता आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक श्री. अजय रात्रा यांचा समावेश आहे.