Usman Khawaja on Ashes 2023: उस्मान ख्वाजाच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धच्या अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात दमदार पुनरागमन केले आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ख्वाजा १२६ धावा करून नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला. दिवसाचा खेळ संपल्यानंतर ख्वाजा पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी पोहोचला त्यावेळी एक सुंदर असे चित्र समोर दिसले. त्याने त्याच्या मुलीला पत्रकार परिषदेत त्याच्यासोबत आणले होते. उस्मान ख्वाजाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक चाहते आणि यूजर्स याला क्रिकेटचे सुंदर क्षण म्हणत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माहितीसाठी! उस्मान ख्वाजा अशा ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सपैकी एक आहे जो नेहमी आपल्या कुटुंबासोबत फिरतो. ख्वाजाला यापूर्वीही अनेक वेळा पत्नी आणि मुलीसोबत मॅचनंतर मैदानात फिरताना पाहिले आहे. सामना संपल्यानंतर उस्मान ख्वाजा पत्रकार परिषदेसाठी आला, त्यावेळी त्यांची मुलगीही त्यांच्यासोबत होती. पत्रकार परिषदेत तो म्हणाला की, “ही मला सोडून कधीच दूर राहू शकत नाही तिला नेहमी मीच हवा असतो म्हणून मी घेऊन आलो.”

दरम्यान उस्मान ख्वाजाला दोन मुली असून एकीचे नाव आयशा आहे आणि दुसरीचे आयला आहे. आयशा तिच्या धाकट्या बहिणीबद्दल बोलत होती. जिचा नुकताच मे २०२२मध्ये जन्म झाला आहे. तिच्या लहान बहिण आयलाबद्दल ख्वाजाला गोड असा प्रश्न विचारते. आयशा म्हणाली, “बाबा, बेबी आयला इथे नाहीये!” यावर ख्वाजाने उत्तर दिले, “हो, ती इथे नाही, बेबी आयला इथे नाही, ती आईसोबत आहे, आम्ही लवकरच परत जाऊ तिच्याकडे, ठीक आहे ना? दोन मिनिटे थांब.” या गोड संभाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

उस्मान ख्वाजाचे धडाकेबाज शतक

उस्मान ख्वाजाचे हे कसोटी क्रिकेटमधील १५वे शतक होते. याबरोबरच त्याने एक ऑस्ट्रेलियन सलामीवीर फलंदाज म्हणून बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन येथे तब्बल २६ वर्षांनी शतक झळकावले आहे. त्याच्या आधी या मैदानावर मार्क टेलरने शेवटच्या वेळी १९९७च्या अ‍ॅशेस मालिकेत १२९ धावा केल्या होत्या. दुसरीकडे, ख्वाजाने २०२२ सालापासून ७ कसोटी शतके झळकावली आहेत. या यादीत त्याने इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटची बरोबरी केली आहे. या काळात जो रूटनेही कसोटीत शतक झळकावले आहेत. या बाबतीत जॉनी बेअरस्टो ६ शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

हेही वाचा: Rohit Sharma: WTC फायनलमधील पराभवानंतर गायब झालेला हिटमॅन आहे तरी कुठे? रितिकाच्या पोस्टने मिळाले चाहत्यांना उत्तर

ऑस्ट्रेलिया इंग्लंडपेक्षा ८२ धावांनी मागे आहे

अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंड संघाने ८ विकेट्सवर ३९८ धावा करून डाव घोषित केला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियानेही दमदार पुनरागमन करत दुसऱ्या दिवसअखेर ५ विकेट्सच्या मोबदल्यात ३११ धावा केल्या आहेत. अशाप्रकारे ऑस्ट्रेलिया आता इंग्लंडपेक्षा केवळ ८२ धावांनी मागे आहे. उस्मान ख्वाजा १२६ धावा करून नाबाद असून त्याला अ‍ॅलेक्स कॅरी चांगली साथ देत आहे, तो ५२ धावा करून खेळत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beautiful picture seen during ashes 2023 usman khawaja arrived for press conference with his daughter video viral avw