न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात भारताने ५३ धावांनी विजय मिळवत, मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताचा जलदगती गोलंदाज आशिष नेहराचा हा शेवटचा आंतराष्ट्रीय क्रिकेट सामना होता. महिन्याभरापूर्वी आपली निवृत्ती जाहीर केलेल्या आशिष नेहराने काल सामना संपल्यानंतर आपल्या चाहत्यांना आणखी एक धक्का दिला. यापुढे आपलं आयपीएल क्रिकेटमधूनही निवृत्ती घेणार असल्याचं आशिष नेहराने जाहीर केलं.
अवश्य वाचा – Video: नेहराजींचं ‘फुटवर्क’ आणि कर्णधार कोहलीही अचंबित !
“काही गोष्टींबद्दल मनात खंत कायम राहिलं. मात्र १८ वर्षाच्या कारकिर्दीनंतर अनेक दुखापतींना तोंड दिल्यानंतर मी यशस्वीपणे क्रिकेटला अलविदा करु शकलो, ही माझ्यासाठी सर्वात सकारात्मक गोष्ट आहे. संघ व्यवस्थापनाने नेहमी माझ्या पाठीशी उभं राहत मला संघात खेळण्याची संधी दिली. काही दिवसांपूर्वी चॅम्पियन्स करंडकातही मी खेळावं असं संघ व्यवस्थापनाचं मत होतं. पण त्यावेळी दुखापतीमुळे मी कोणताही सामना खेळू शकणार नव्हतो. माझ्यासाठी संघातले १५ खेळाडू हे महत्वाचे होते. त्यावेळी माझ्या मताचा संघ व्यवस्थापनाने आणि बीसीसीआयने आदर केला याबद्दल मी त्यांचा कायम ऋणी राहिन.” आशिष नेहरा पत्रकारांशी संवाद साधत होता.
याचवेळी माझे सहकारी मी आयपीएल सामन्यांमधून निवृत्त होत असल्याचं कळताच आश्चर्यचकीच झाल्याचंही आशिष म्हणाला. “सध्या वयाची ३५ ओलांडल्यानंतर केवळ आयपीएलच्या सामन्यांसाठी सकाळी लवकर उठून सराव करणं मला पटत नाही. आतापर्यंत माझ्यावर १० ते १२ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत मला आराम करण्याची गरज असल्यामुळे मी आयपीएल सामन्यांमध्येही न खेळण्याचा निर्णय घेतल्याचं”, नेहराने स्पष्ट केलं.
अवश्य वाचा – BLOG : वेल डन नेहरा
२००८ साली आयपीएलच्या पहिल्या हंगामात आशिष नेहराने मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केलं. यानंतर त्याने पुणे वॉरियर्स, दिल्ली डेअरडेविल्स, चेन्नई सुपरकिंग्ज, सनराईजर्स हैदराबाद अशा संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. निवृत्तीनंतर काही दिवस आराम करत आपण प्रशिक्षण किंवा समालोचन या क्षेत्रात काम करणार असल्याचं आशिष नेहराने काल स्पष्ट केलंय. त्यामुळे आगामी काळात आयपीएल सामन्यांमध्ये आशिष नेहराला कोणता संघ प्रशिक्षणाची जबाबदारी देतो का हे पहावं लागणार आहे.