भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईचा असणारा दबदबा आता सर्वश्रुत आहे. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये मानाचं स्थान असलेल्या रणजी स्पर्धेचं मुंबईने ४१ वेळा विजेतेपद पटकावलं आहे. भारतीय क्रिकेट संघामध्ये काही वर्षांपूर्वी मुंबईच्या खेळाडूंचं वर्चस्व पहायला मिळायचं. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई क्रिकेट झालेली दुरावस्था आणि स्थानिक क्रिकेटमध्ये अन्य संघांकडून मिळणारी कडवी लढत यामुळे मुंबईचं स्थान डळमळीत झालेलं आहे. काही ठराविक खेळाडूंचा अपवाद वगळला तर मुंबईच्या खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळताना दिसत नाही. मुंबई क्रिकेटच्या या अधोगतीला आयपीएलचा वाढता प्रभाव कारण ठरल्याचं मत भारताचे माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत आणि अभिषेक नायर यांनी व्यक्त केलं आहे.

“आयपीएलच्या आगमनानंतर क्रिकेट आता पैशाचा खेळ झाला आहे. सध्याच्या पिढीत मुंबईचे तरुण खेळाडू मुंबईकडून खेळण्याऐवजी आयपीएलमध्ये खेळण्याची संधी कशी मिळेल याची स्वप्न पाहताना दिसतात. सध्याच्या पिढीचा हा दृष्टीकोन अतिशय चुकीचा आहे. भारतीय संघात प्रवेश करण्यासाठी तुम्ही तुमच्या राज्याच्या संघाकडून पहिल्यांदा खेळलं पाहिजे, आयपीएलमध्ये खेळणं हा प्रकार ओघाने येतोच.” लालचंद राजपूत बोलत होते. तरुण खेळाडूंचा क्रिकेटप्रती दृष्टीकोन बदलण्यामागे पैसा हा घटक कारणीभूत असल्याचं राजपूत म्हणाले. याच कारणामुळे गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई क्रिकेटची अधोगती झालेली आहे.

पूर्वीच्या काळात सौराष्ट्र, गुजरातसारखे संघ मुंबईविरुद्ध खेळताना घाबरायचे. कित्येक वेळा प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू सामन्यादरम्यान, आम्हाला जास्त वेळ क्षेत्ररक्षण करायला लावू नका अशी विनंती करायचे. मात्र गेल्या काही वर्षांमधली मुंबईची कामगिरी पाहिली तर, आता अन्य संघांना आपण मुंबईला सहज हरवु शकतो हा आत्मविश्वास आलेला आहे. आगामी काळात हा दृष्टीकोन मुंबई क्रिकेटसाठी अतिशय धोकादायक ठरु शकतो असं राजपूत यांनी स्पष्ट केलं. राजपूत यांच्यासोबत अभिषेक नायरनेही मुंबई क्रिकेटच्या दुरावस्थेकडे बोट ठेवलं. सिद्धेश लाड आणि श्रेयस अय्यर यांसारखे खेळाडू रणजी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करतायत, मात्र त्यांना भारतीय संघात हवीतशी संधी मिळत नाही. मात्र दुसरीकडे ऋषभ पंतला त्याच्या चांगल्या कामगिरीचं फळ मिळतं. त्यामुळे आगामी काळात मुंबई क्रिकेटला अतिशय सजग राहणं गरजेचं असल्याचं नायर म्हणाला.

Story img Loader