Ajinkya Rahane’s Indian Selection in Test squad: भारतीय निवड समितीने अखेर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) २०२३ च्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या जेतेपदाच्या सामन्यासाठी, संघात दीर्घ कालावधीनंतर अजिंक्य रहाणेचे पुनरागमन झाले आहे, जो त्याच्या खराब फॉर्ममुळे बाहेर पडला होता. संघात त्याच्या पुनरागमनाची दोन प्रमुख कारणे समोर येत आहेत, एक म्हणजे श्रेयस अय्यर अनफिट असणे आणि दुसरे म्हणजे निवडीपूर्वी धोनीने दिलेले काही इनपुट.
आयपीएलच्या १६व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग असलेल्या अजिंक्य रहाणेचा एक वेगळाच अवतार बॅटसोबत पाहायला मिळत आहे. दरम्यान, टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समितीने अजिंक्य रहाणेचा डब्ल्यूटीसी फायनलसाठी संघात समावेश करण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीचाही सल्ला घेतला होता.
अजिंक्य रहाणेने आपला शेवटचा कसोटी सामना जानेवारी २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळला होता. त्यानंतर खराब फॉर्ममुळे त्याला वगळण्यात आले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळल्यानंतर त्याला आयपीएलच्या या मोसमात सीएसकेकडून खेळण्याची संधी मिळाली, जिथे त्याची कामगिरी एका वेगळ्या पातळीवर पाहायला मिळत आहे. रहाणेने आतापर्यंत ५ डावात ५२.२५ च्या सरासरीने २०९ धावा केल्या, असून या काळात त्याचा स्ट्राईक रेट १९९.०४ राहिला आहे.
हेही वाचा – IPL 2023 RR vs CSK: ‘… म्हणून अजिंक्य रहाणे निर्भयपणे फलंदाजी करतोय’; ड्वेन ब्राव्होचा मोठा खुलासा
इंग्लंडमध्येही खेळण्याचा अनुभव –
भारतीय संघाला हा विजेतेपदाचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर खेळायचा आहे. अजिंक्य रहाणेला त्या परिस्थितीत खेळण्याचा अनुभव आहे आणि त्याने आतापर्यंत २९ डावांमध्ये २६ च्या जवळपास सरासरीने ७२९ धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे.
अजिंक्य रहाणेबाबत महेंद्रसिंग धोनीकडून घेतलेले इनपुट –
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अजिंक्य रहाणेची निवड करण्यापूर्वी भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समितीने महेंद्रसिंग धोनीकडून माहिती घेतली होती. युएईमध्ये २०२१ च्या टी-२० विश्वचषकादरम्यान धोनी टीम इंडियाचा मेंटॉर होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी टीम इंडिया सराव सामना खेळू शकते, असेही समोर आले आहे. आयपीएल २०२३ चे प्लेऑफ २३ मे पासून होणार आहेत. डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यासाठी निवडलेले खेळाडू जे यात सहभागी होणार नाहीत ते तयारीसाठी आधी इंग्लंडला रवाना होऊ शकतात.