भारत आणि ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट संघ २० सप्टेंबर रोजी खेळल्या जाणाऱ्या टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी मोहालीला पोहोचले आहेत. तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना मोहालीत खेळवला जाणार आहे. सामन्याच्या अगोदर, चंडीगड पोलिसांनी पंजाब क्रिकेट असोसिएशनला (पीसीए) थकबाकी भरण्यास सांगितले आहे. पीसीएकडे गेल्या ८ वर्षांपासून ५ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
द इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, पोलीस अधीक्षक (वाहतूक/सुरक्षा) यांनी शनिवारी पीसीए अधिकार्यांशी बोलताना हा मुद्दा उचलला होता. वाहतूक पोलीस अधीक्षक मनीषा चौधरी म्हणाल्या, “आम्ही चंडीगड मध्ये भारतीय आणि ऑस्ट्रेलियन संघांच्या मुक्कामासाठी कायदा व सुरक्षेची संपूर्ण व्यवस्था केली आहे. तसेच, पंजाब क्रिकेट असोसिएशनला मोहाली येथे झालेल्या मागील सामन्यांचे थकबाकी भरण्यास सांगितले आहे, जी सुरक्षा चंडीगड पोलिसांनी खेळाडूंना पुरवली होती.
पीसीएचे सचिव दिलशेर खन्ना यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे कारण देत यावर भाष्य केले नाही. ते म्हणाले, “चंदीगड पोलीस क्रिकेट संघांना पूर्ण सहकार्य आणि सुरक्षा पुरवत आहेत. प्रलंबित प्रश्न हा सुरक्षा बिलांशी संबंधित असून हे प्रकरण विचाराधीन आहे. याचा २० तारखेच्या सामन्याशी कुठलाही संबध नाही. दोन्ही देशांचे क्रिकेट संघ शहरात दाखल होताच चंदीगड पोलिसांनी कडेकोट सुरक्षा पुरवली आहे. शुक्रवारी दुपारी शहरात आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला चंदीगड पोलिसांनी प्रदान केलेल्या काही कर्मचाऱ्यांसह त्यांच्या हॉटेलमध्ये नेण्यात आले.”
दरम्यान, टी२० मालिकेच्या तयारीसाठी ऑस्ट्रेलियाने शनिवारी आयएस बिंद्रा पीसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पहिले सराव सत्र आयोजित केले होते. भारतीय संघ रविवारपासून सराव सत्राला सुरुवात करणार आहे.