WTC 2023 Final India vs Australia: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीच्या (२०२१-२३) अंतिम फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. दोन्ही संघ प्रथमच ही ट्रॉफी जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. भारतीय संघाला २०१३ नंतरची पहिली आयसीसी ट्रॉफी जिंकायची आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या सामन्यात दोन्ही संघांनी हाताला काळी पट्टी बांधली आहे. काय आहे त्यामागील कारण? जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून आजच्या सामन्यात रविचंद्रन अश्विनऐवजी अष्टपैलू रवींद्र जडेजाचा संघात समावेश करण्यात आला आहे. सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी दोन्ही संघांनी ओडिशा येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेतील मृतांना दोन मिनिटे मौन बाळगून श्रद्धांजली वाहिली. त्याच्या स्मरणार्थ दोन्ही संघांनी डाव्या हाताला काळी पट्टी बांधली आहे.

काही दिवसांपूर्वी ओडिशा येथे झाला होता मोठा रेल्वे अपघात

ओडिशामध्ये शुक्रवारी (२ जून) संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात किमान २८८ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ९०० जण जखमी झाले आहेत. ओडिशाच्या बालासोरमधील बहनगा स्टेशनजवळ बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने सायंकाळी ७ वाजता हा अपघात झाला. तर तिसरी ट्रेन म्हणजेच मालगाडीला पॅसेंजर ट्रेनचे रुळावरून घसरलेले डबे आदळले होते. ओडिशा रेल्वे अपघात हा मागील काही वर्षांतील सर्वात भीषण अपघात ठरला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ही दुसरी फायनल आहे. येथे जिंकणारा संघ तिन्ही फॉरमॅटमध्ये आयसीसी ट्रॉफी जिंकणारा पहिला संघ बनेल. कसोटी चॅम्पियनशिपची पहिली अंतिम फेरी जिंकणाऱ्या न्यूझीलंड संघाला एकदिवसीय आणि टी२० विश्वचषक जिंकता आलेला नाही. त्याचबरोबर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांनी पहिला एकदिवसीय आणि टी२० विश्वचषक जिंकला आहे.

सामन्यात काय सध्य परिस्थिती?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली आहे. दोन धावांवर ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट पडली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीत सर्वाधिक धावा करणारा उस्मान ख्वाजा खाते न उघडताच बाद झाला आहे. ख्वाजाने १० चेंडूंचा सामना केला आणि मोहम्मद सिराजने त्याला यष्टिरक्षक श्रीकर भरतकरवी झेलबाद केले. आता डेव्हिड वॉर्नरसोबत मार्नस लाबुशेन खेळपट्टीवर आहे. ६ षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या १ बाद १६ अशी झाली आहे.

हेही वाचा: WTC Final IND vs AUS: भारताने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय! ओव्हलमध्ये कशी असेल खेळपट्टी? जाणून घ्या प्लेईंग ११

दोन्ही संघाची प्लेईंग ११

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया: डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अ‍ॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Before the start of the match both the teams a minute silence in remembrance of the victims of the odisha train accident avw