Cheteshwar Pujara Century: आयपीएलमध्ये सर्व भारतीय फलंदाज धमाल करत असताना, टीम इंडियाचा कसोटी विशेषज्ञ चेतेश्वर पुजारा कौंटी क्रिकेटमध्ये आपली प्रतिभा दाखवत आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कौंटी क्रिकेटमध्ये यावेळी पुजारा कर्णधार म्हणून खेळायला आला आणि त्याने तिसऱ्या सामन्यात दुसरे शतक ठोकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी ऑस्ट्रेलियाला सावधान करत मी सज्ज असल्याचे दाखवून दिले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना ७ जूनपासून इंग्लंडमध्येच खेळवला जाणार आहे. अशा स्थितीत पुजारा इंग्लिश भूमीवर अशा प्रकारे धावा काढताना पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडूंची चिंता नक्कीच वाढली असेल.
पुजाराच्या खेळीबद्दल बोलायचे झाले तर ग्लॉस्टरशायरविरुद्धच्या या सामन्यात ससेक्स संघाला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाले. याचा पुरेपूर फायदा पुजाराच्या संघाने घेतला आणि पहिला डाव ४५५ धावांवर घोषित केला. यादरम्यान पुजाराने ससेक्ससाठी सर्वाधिक १५१ धावा केल्या, या डावात त्याने २३८ चेंडूंचा सामना केला आणि २० चौकारांसह २ षटकारही ठोकले. पुजाराशिवाय ससेक्सच्या एकाही फलंदाजाने शतक झळकावता आले नाही.
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने ससेक्ससाठी प्रथम फलंदाजी करताना सामन्याच्या तिसऱ्या दिवशी १९१ चेंडूत शतक पूर्ण केले. या महिन्याच्या सुरुवातीला पुजाराने ससेक्सकडून होव्ह येथे डरहमविरुद्ध त्याच्या पूर्णवेळ कर्णधारपदाच्या पदार्पणात ११५ धावा केल्या. या शतकासह पुजाराने वसीम जाफरला मागे टाकले आहे, ज्याची ५७ प्रथम श्रेणी शतके आहेत. प्रथम श्रेणीतील सर्वाधिक शतके करणारा तो पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे. या यादीत सचिन तेंडुलकर (८१), सुनील गावसकर (८१), राहुल द्रविड (६८) आणि विजय हजारे (६०) पुजाराच्या पुढे आहेत.
ससेक्सविरुद्धच्या सामन्यात ग्लॉस्टरशायर संघ पहिल्या डावात सर्वबाद होण्यापासून एक विकेट दूर आहे. तिसर्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ग्लॉस्टरशायरने ९ बाद १९८ धावा केल्या होत्या. ग्लॉस्टरशायर अजूनही ससेक्सपेक्षा २५७ धावांनी मागे आहे. पुजाराचे हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ५८वे शतक आहे, त्याने आतापर्यंत ५१.६१च्या अप्रतिम सरासरीने १८८३९ धावा केल्या आहेत.
दुसरीकडे, त्याच्या कौंटी कारकिर्दीबद्दल बोलताना, पुजाराने या हंगामात ससेक्ससाठी ३२२ धावा केल्या आहेत, तर मागील हंगाम देखील त्याच्यासाठी खूप चांगला होता. आतापर्यंत या भारतीय फलंदाजाने कौंटी क्रिकेटमध्ये खेळल्या गेलेल्या ११ सामन्यांमध्ये ७ शतके ठोकली आहेत. त्याच्या मागील हंगामाबद्दल बोलायचे तर पुजाराने ८ सामन्यात १०९४ धावा केल्या ज्यात ३ द्विशतकांचा समावेश आहे. त्या काळात पुजाराची सरासरी १०९ पेक्षा जास्त होती जी अविश्वसनीय अशी आहे.
भारतीय संघाचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारा जूनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलपूर्वी चेतेश्वर पुजारा ससेक्सकडून खेळत आहे. शनिवारी बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर ग्लॉस्टरशायरविरुद्धच्या दुसऱ्या विभागीय कौंटी चॅम्पियनशिप सामन्यात ससेक्ससाठी तीन सामन्यांमध्ये त्याने दुसरे शतक ठोकले. यावरून त्याने एकप्रकारे कांगारूंना पाणी पाजण्यासाठी सज्ज आहे असा संदेश दिला.