Irfan Pathan, IND vs WI T20 Series Sunday: वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारतीय संघाने ५ सामन्यांची टी२० मालिका २-३ने गमावली. मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना रविवारी (१३ ऑगस्ट) फ्लोरिडामध्ये खेळला गेला, ज्यामध्ये भारताला ८ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. भारताच्या या पराभवानंतर टीम इंडियाचा माजी खेळाडू इरफान पठाण ट्वीटरवर ट्रोल होऊ लागला. मागील वर्षी भारताने २०२२च्या टी२० विश्वचषकात पाकिस्तानचा रोमहर्षक सामन्यात पराभव केला होता.
नुकतेच, रविवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेतील निर्णायक सामन्यातही भारतीय संघाचा पराभव झाला. वर्ल्ड कप २०२२ मध्ये पाकिस्तानच्या पराभवानंतर इरफान पठाणने मजेशीर ट्वीट केले होते, ज्यामध्ये लिहिले होते- शेजारी रविवार कसा होता??? म्हणजे भारताच्या विजयानंतर त्यांनी पाकिस्तानी जनतेला टोमणा मारला होता. येथे पहा इरफान पठाणचे वर्ल्ड कप २०२२चे ट्वीट…
आता वेस्ट इंडिजविरुद्ध भारताच्या पराभवानंतर काही पाकिस्तानी चाहते रविवारच्या नावाने इरफान पठाणला ट्रोल करत आहेत. येथे पाहा ट्रोलर्सच्या प्रतिक्रिया…
इरफान पठाणने चोख प्रत्युत्तर दिले
इरफान पठाणने ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. पठाणने ट्वीट करून लिहिले, “बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना.” यापुढे त्याने रविवार आणि शेजारी हे हॅशटॅगही वापरले. या ट्वीटद्वारे इरफानला सांगायचे होते की, “भारताला कोणीतरी हरवले आहे आणि कोणालातरी त्याचा आनंद होत आहे.”
भारताचा आघाडीचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने शेजारील देशातील क्रिकेट चाहत्यांची खिल्ली उडवण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा पराभव झाल्यानंतरही त्याने पाकिस्तानी चाहत्यांना टोमणा मारणारे ट्वीट केले होते. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून इरफान पठाण समालोचकाच्या भूमिकेत सक्रियपणे गुंतला आहे. दुसरीकडे टीम इंडियाबद्दल बोलायचे झाले तर, आयर्लंडविरुद्ध टी२० मालिका खेळल्यानंतर ते आशिया कपमध्ये खेळताना दिसणार आहेत.
भारतीय संघाने अलीकडेच वेस्ट इंडिज दौऱ्यात कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकली परंतु टी२० फॉर्मेटमध्ये त्यांना संघर्ष करावा लागला. सुरुवातीचे दोन सामने गमावल्यानंतर पुढचे दोन सामने जिंकूनही भारताला शेवटचा सामन्यात पराभवाची धूळ चाखावी लागली. २०१७ नंतर भारतावर वेस्ट इंडिजचा हा पहिला मालिका विजय आहे.