भारताच्या पुरुष संघाची २१ वर्षांखालील गटाच्या आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेतील विजयी मालिका बेल्जियमने खंडित केली. त्यांनी भारतास ३-१ असे पराभूत केले.
भारताने या स्पर्धेत जर्मनी व न्यूझीलंड यांच्याविरुद्ध विजय मिळवीत अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र साखळी गटाच्या तिसऱ्या लढतीत त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. पूर्वार्धात एकही गोल झाला नाही. भारताने त्यामध्ये पेनल्टी कॉर्नरच्या अनेक संधी वाया घालवल्या. बेल्जियमलाही पेनल्टी कॉर्नरच्या काही संधी मिळाल्या मात्र भारताचा गोलरक्षक सूरज करकेराने भक्कम गोलरक्षण करीत त्यांच्या या चाली असफल ठरविल्या.
उत्तरार्धात सामन्याच्या ४२व्या मिनिटाला बेल्जियमच्या टॉम डेग्रुटेने खणखणीत फटका मारून संघाचा पहिला गोल केला. मात्र त्यांचा हा आनंद फार वेळ टिकला नाही. ४८व्या मिनिटाला हरमानप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरद्वारा गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर सात मिनिटांनी बेल्जियमला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत तांगुई झिमेरने गोल करीत संघास २-१ अशी आघाडी मिळवून दिली. ६२व्या मिनिटाला त्याचा सहकारी झेवियर डेरुत्तिरेने गोल करीत संघाची आघाडी वाढविली. हीच दोन गोलांची आघाडी कायम ठेवीत बेल्जियमने सामना जिंकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा