|| ऋषिकेश बामणे

रोमहर्षक अंतिम सामन्यात नेदरलँड्सवर ‘सडन डेथ’मध्ये ३-२ अशी मात

पहिल्या चारही सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात आलेले अपयश, पेनल्टी शूटआऊटमध्ये झालेली २-२ अशी बरोबरी आणि त्यानंतर सडन डेथमध्ये नेदरलँड्सच्या जेरोनी हट्र्झबर्गरला गोल करण्यात आलेले अपयश.. अशा सर्व नाटय़मय व रोमहर्षक ठरलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात झुंजार बेल्जियमने बलाढय़ नेदरलँड्सला ३-२ असे पराभूत करून प्रथमच विजेतेपदाला गवसणी घालत एका नव्या युगाचा श्रीगणेशा केला.

पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी बचावावर भर दिला. मात्र सातव्यांदा अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या नेदरलँड्सची बचावफळी बेल्जियमपेक्षा किंचीत उजवी ठरत होती. पहिल्या सत्रात कोणत्याही संघास गोल करता आला नाही. दुसऱ्या सत्रातदेखील दोन्ही संघांमधील गोल करण्यासाठी सुरू असलेला संघर्ष पहायला मिळाला. २८व्या मिनिटाला नेदरलँड्सला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र जेरॉन हट्र्झबर्गरच्या स्ट्रोकचे कर्णधार बिली बेकरला गोलमध्ये रुपांतर करण्यात यश आले नाही. ३०व्या मिनिटाला नेदरलँड्सला पुन्हा एकदा पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण यावेळी मिंक व्हॅन डरने संधी गमावल्याने नेदरलँड्सच्या पदरी पुन्हा निराशा पडली.

मध्यंतरानंतरदेखील कोणालाही गोल करता आला नाही. त्यामुळे सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये जाणार, याची चाहत्यांना जाणीव झाली. मात्र सडन डेथमध्ये हट्र्झबर्गर अपयशी ठरला व बेल्जियमने एकच जल्लोष केला.

हॉकीच्या मैदानातही सचिन.. सचिन..

२४ वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत असंख्य रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सचिन तेंडुलकरचे हॉकी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मध्यंतरादरम्यान मैदानावर आगमन होताच संपूर्ण स्टेडियममध्ये ‘सचिन.. सचिन..’चा जयघोष झाला. ‘‘भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असले तरी त्यांनी केलेल्या दमदार कामगिरीचा मला अभिमान वाटतो. त्याशिवाय अतिशय सुंदररीत्या या विश्वचषकाचे आयोजन केल्यामुळे मी संपूर्ण ओदिशा राज्याचे, व्यवस्थापकांचे अभिनंदन करतो,’’ असे सचिन म्हणाला.

इंग्लंडचा धुव्वा उडवत ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानी

गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या स्थानासाठी (कांस्यपदक) झालेल्या लढतीत पांरपरिक प्रतिस्पर्धा इंग्लंडला ८-१ असे नामोहरम केले. ऑस्ट्रेलियासाठी टॉम क्रेगने तीन (९+१९+३४ वे मिनिट), जेर्मी हेवार्डने दोन (५७+६० मि.) तर, ब्लेक गोव्हर्स (८), ट्रेंट मिटॉन (३२) व टिम ब्रँड (३४) यांनी प्रत्येकी एक गोल केला. इंग्लंडतर्फे बॅरी मिडलटनने ४५व्या मिनिटाला एकमेव गोल नोंदवला. ऑस्ट्रेलियाने नोंदवलेल्या आठ गोलपैकी पाच गोल मैदानी, तर तीन गोल पेनल्टी कॉर्नरवर झाले. विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध मागील १३ सामन्यांतील ऑस्ट्रेलियाचा हा ११वा विजय ठरला. तीन गोल झळकावणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या टॉम क्रेगला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

Story img Loader