पॅरिस : उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघासमोर पॅरिस ऑलिम्पिकच्या ‘ब’ गटात गुरुवारी गतविजेत्या बेल्जियमचे आव्हान असणार आहे. यावेळी भारताला आपल्या कामगिरीत सातत्य राखणे गरजेचे आहे.
बेल्जियमचा संघ ‘ब’ गटात तीन सामन्यांत विजय मिळवत शीर्ष स्थानी आहे. तर, भारत दोन विजय व एका बरोबरीसह दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया दोन विजय व एक पराभवामुळे तिसऱ्या स्थानी आहे. तसेच, अर्जेंटिनानेही एक विजय, एक पराभव व एका बरोबरीसह अंतिम आठ संघात स्थान मिळवले आहे. न्यूझीलंड व आयर्लंड संघांना तीन पराभवाचा सामना करावा लागल्याने संघ बाद स्पर्धेबाहेर पडले आहेत. प्रत्येक गटातील शीर्ष चार संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणार आहेत.
हेही वाचा >>>Paris Olympic 2024 Day 5 Highlights : कसं असणार भारताचं १ ऑगस्टचं वेळापत्रक? कोणकोण अॅक्शनमध्ये दिसणार? जाणून घ्या
भारताने पहिल्या सामन्यात न्यूझीलंडवर ३-२ अशा फरकाने विजय मिळवला. यानंतर अखेरच्या मिनिटात केलेल्या गोलच्या मदतीने २०१६ च्या विजेत्या अर्जेंटिनाला बरोबरीत रोखले. तर, भारताने आयर्लंडला २-० अशा फरकाने नमवले. बेल्जियमनंतर भारताला ऑस्ट्रेलियाचा सामना करायचा आहे.