ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर अॅशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र संपूर्णपणे ऑस्ट्रेलियाच्या नावावर होते. पहिल्या दिवशी इंग्लंडला १४७ धावांत गुंडाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियाने १ बाद ११३ धावा केल्या होत्या. मार्कस हॅरिसच्या विकेटनंतर डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लाबुशेन यांनी एकही विकेट पडू दिली नाही आणि संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. यादरम्यान वॉर्नर नशीबवान असला, तरी त्याला बेन स्टोक्सने बोल्ड केले, पण नो-बॉलमुळे तो क्रीजवरच राहिला.
स्टोक्सच्या पहिल्याच षटकावरून वाद सुरू झाला. ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या १३व्या षटकात कर्णधार जो रूटने बेन स्टोक्सकडे चेंडू सोपवला. पहिल्या तीन चेंडूंवर चार धावा आल्या आणि चौथ्या चेंडूवर वॉर्नर क्लीन बोल्ड झाला. टीव्ही अंपायरने तपासले असता तो नो-बॉल असल्याचे आढळून आले. त्यावेळी वॉर्नर १७ धावा करून खेळत होता. नंतरच्या रिप्लेवरून असे दिसून आले, की स्टोक्सचे पहिले तीन चेंडूही नो बॉल होते, ज्याकडे टीव्ही अंपायरने दुर्लक्ष केले.
हेही वाचा – धक्कादायक सत्य आलं समोर..! कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यापूर्वी BCCIनं विराट कोहलीला दिले…
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने यावर नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, की जर टीव्ही अंपायरचे काम नो-बॉल तपासणे असेल आणि तो ते करू शकत नसेल, तर माझ्या मते ते पूर्णपणे मूर्खपणाचे आहे. स्टोक्सच्या नो-बॉलवर बोल्ड होऊन वॉर्नरने त्याला मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतला.