Ben Stokes raised questions on technology : पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडचा १०६ धावांनी पराभव केला. विशाखापट्टणम येथे झालेल्या या सामन्यात इंग्लंडचा संघ ३९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना २९२ धावांवर गारद झाला. या विजयासह भारताने कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. या सामन्यातील पराभवावर प्रतिक्रिया देताना बेन स्टोक्सने तंत्रज्ञानावर प्रश्न उपस्थित केले.
क्रॉऊलीला आऊट दिल्याने स्टोक्स संतापला –
दुसऱ्या कसोटीतील पराभवानंतर इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सच्या वेदना व्यक्त झाल्या. पराभवानंतर स्टोक्सने तंत्रावरही प्रश्न उपस्थित केले. डीआरएस तंत्रातील चुकीमुळे झॅक क्रॉऊलीला एलबीडब्ल्यू आऊट व्हावे लागल्याचे स्टोक्सने सांगितले. दुसऱ्या डावात ७३ धावा केल्यानंतर कुलदीप यादवच्या चेंडूवर क्रॉऊलीला एलबीडब्ल्यू घोषित करण्यात आले.
क्रॉऊलीला मैदानावरील पंचांनी आऊट दिले नाही, पण भारतीय कर्णधार रोहित शर्माने डीआरएस घेतल्यानंतर त्याला आऊट घोषित करण्यात आले. कुलदीपचा चेंडू मधल्या स्टंपलासमोर आदळल्यानंतर लेग स्टंपकडे वळत होता. डीआरएसमध्ये चेंडू लेगस्टंपला स्पर्श करताना दिसला, पण स्टोक्स याच्याशी सहमत नव्हता.
सामन्यानंतर स्टोक्स म्हणाला, ‘खेळात तंत्रज्ञानाचा वापर स्पष्टपणे दिसून येतो. तो कधीच १०० टक्के बरोबर असू शकत नाही. याची कारणे प्रत्येकाला समजतात. त्यामुळे आपल्याकडे अंपयार्स कॉल्स आहे. मला वाटते या प्रसंगी तंत्रज्ञानाने चुकीचा निकाल दिला. हे माझे वैयक्तिक मत आहे. मी असे म्हणणार नाही की ते आमच्या पराभवाचे कारण होते. या निमित्ताने तंत्रज्ञान चुकीचे ठरले, असे माझे वैयक्तिक मत आहे एवढेच मी सांगत आहे.’
हेही वाचा – IND vs ENG : अश्विनच्या ५००व्या कसोटी विकेटवरुन गोंधळ, पहिल्यांदा अंपायरने दिले आऊट नंतर बदलला निर्णय
आता तो निर्णय मागे घेता येणार नाही: स्टोक्स
इंग्लंडचा कर्णधार म्हणाला, ‘तुम्ही भूतकाळातील गोष्टींसह फार काही करू शकत नाही. एक निर्णय घेतला गेला आहे, आणि घेतलेला निर्णय तुम्ही मागे घेऊ शकत नाही.’ स्टोक्स पुढे म्हणाला, ‘आज सकाळी उठल्यानंतर काही खेळाडूंना बरे वाटत नव्हते. जेव्हा प्रत्येकामध्ये समान लक्षणे दिसतात, तेव्हा तुम्हाला कळते की काहीतरी घडत आहे. आमच्या खेळाडूंना कदाचित व्हायरसची लागण झाली आहे. मात्र, हे पराभवाचे किंवा कशाचेही निमित्त नाही.