Ben Stokes equals Ian Botham and Harry Brooke’s records: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात अॅशेस मालिकेतील दुसरा सामना लॉर्डस मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यातील पाचव्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने वादळी खेळी करत शतक झळकावले. स्टोकच्या कसोटी कारकिर्दीतील हे १३ वे तर ऑस्ट्रेलियाविरुद्धचे दुसरे कसोटी शतक आहे. बेन स्टोक्सने षटकारांची हॅट्ट्रिक लगावक आपले शतक पूर्ण केले. या खेळीच्या जोरावर त्याने एक खास कानामा केला आहे. त्याने षटकार मारुन शतक पूर्ण केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

बेन स्टोक्सने षटकाराची हॅटट्रिक करत शतक पूर्ण केले –

बेन स्टोक्सने दुसऱ्या डावात कॅमेरुन ग्रीनच्या षटकात सलग तीन चेंडूवर तीन षटकार मारून आपले १३वे कसोटी शतक पूर्ण केले. शतक पूर्ण करण्यासाठी त्याने १४२ चेंडूंचा सामना केला. यादरम्यान त्याने ४ षटकार आणि ८ चौकार लगावले. बेन स्टोक्सने १२८ चेंडूत पहिल्या ६४ धावा केल्या होत्या, पण त्यानंतर १३ चेंडूत ३६ धावा करत आपले शतक पूर्ण केले.

कॅमेरून ग्रीनच्या षटकात बेन स्टोक्सने २४ धावा कुटल्या.

लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात कॅमेरून ग्रीनच्या एका षटकात बेन स्टोक्सने २४ धावा कुटल्या. या २४ धावांमध्ये त्याने षटकाराच्या हॅट्ट्रिकलह चौकारही ठोकले. बेन स्टोक्सने कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून एका षटकात सर्वाधिक धावा करणाऱ्या इयान बॉथम आणि हॅरी ब्रूकच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

कसोटीत इंग्लंडसाठी एका षटकात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –

२७ – हॅरी ब्रूक विरुद्ध जाहिद महमूद, रावळपिंडी २०२२/२३
२४ – इयान बॉथम विरुद्ध डेरेक स्टर्लिंग, द ओव्हल १९८६
२४ – हॅरी ब्रूक विरुद्ध सौद शकील, रावळपिंडी २०२२/२३
२४- धावा – बेन स्टोक्स विरुद्ध कॅमेरून ग्रीन, लॉर्ड्स 2023

लंचपर्यंत इंग्लंडची धावसंख्या ६ बाद २४३ –

लॉर्ड्स कसोटीच्या शेवटच्या दिवशी लंचपर्यंत इंग्लंडची धावसंख्या 6 बाद २४३ आहे. तसेच हा संघ विजयापासून १२८ धावा दूर आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी चार विकेट्सची गरज आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स १०८ धावांवर खेळत असून स्टुअर्ट ब्रॉड त्याला साथ देत आहे. जॉनी बेअरस्टो बाद झाल्यानंतर स्टोक्सने आक्रमक फलंदाजी करत ऑस्ट्रेलियापासून झपाट्याने सामना हिरावून घेतला. पुढील सत्रात स्टोक्सला लवकरात लवकर बाद करण्याचा कांगारू संघ प्रयत्न करेल. तसे न झाल्यास स्टोक्स तासाभरात सामना संपवू शकतो.