ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवरील अपुऱ्या सांडपाणी व्यवस्थेमुळे रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेतील ‘अ’ गटाच्या मुंबई आणि बंगाल लढतीच्या चौथ्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रात्री ०.१ मिमी पावसाचा वर्षांव झाला. त्यामुळे सकाळी मैदानाची स्थिती खेळण्यायोग्य राहिली नाही. बंगालच्या संघाला एक गुण मिळाला, तर विजयासाठी आशावादी असणाऱ्या मुंबईच्या संघाला तीन गुणांवर समाधान मानावे लागले.
बुधवारी दिवसभरात पाच वेळा सामनाधिकारी सुनील चतुर्वेदी यांनी मैदानाची पाहणी केली आणि दुपारी दीड वाजता खेळ रद्द करण्यात आल्याची घोषणा केली. फॉलोऑन स्वीकारल्यानंतर बंगालची बिनबाद १२९ अशी स्थितीत होती. परंतु तरी ते ७५ धावांनी पिछाडीवर होते.
मुंबईने चार सामन्यांतून १० गुण कमावले आहेत. ‘अ’ गटात कर्नाटक अव्वल स्थानावर असून, बंगालचा (४) संघ गटात तळाच्या स्थानावर आहे.
‘‘मैदानावर ओलसरपणा आणि चिखल होता. त्यामुळे खेळणे कठीण होते. दुखापतींची शक्यतासुद्धा नाकारता येत नसल्याने आम्ही दिवसभराचा खेळ रद्द केला,’’ असे चतुर्वेदी यांनी सांगितले.
‘‘किमान दोन तास सूर्यप्रकाश पडला असता तर आम्ही मैदान खेळण्यायोग्य केले असते. परंतु खराब प्रकाश आणि ओलसर मैदान यावर मात करता आली नाही,’’ असे ईडन गार्डन्सचे क्युरेटर प्रबीर मुखर्जी यांनी सांगितले.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ४१४
बंगाल (पहिला डाव) : सर्व बाद २१० (अभिमन्यू इस्वरन ८५, मनोज तिवारी ६३; शार्दुल ठाकूर ५/५९)
बंगाल (दुसरा डाव) : बिनबाद १२९ (अरिंदम दास नाबाद ८०, रोहन बॅनर्जी नाबाद ४४)
गुण : मुंबई ३, बंगाल १.