दिग्गज खेळाडूंना झालेल्या दुखापती, तरीही त्यांना खेळवण्याचा अट्टाहास आणि त्यामुळे घसरलेला खेळाचा दर्जा हे सोमवारी जयपूर पिंक पँथर्स संघाच्या कामगिरीने अधोरेखित केले. या वेळी बंगाल वॉरियर्सच्या वाघांनी जयपूरच्या जायबंदी ‘पँथर्स’ची ३४-१८ अशी शिकार केली.
दुखापत होऊनही घरच्या मैदानात दोन्ही सामन्यांमध्ये उतरलेला जसवीर सिंग या सामन्यात संघाबाहेरच राहिला. दुखापतग्रस्त कर्णधार नवनीत गौतमला एकही पकड करता आली नाही. पर्यायी चढाईपटू असलेल्या गौतमने फक्त एकच चढाई केली आणि तीदेखील निष्फळ ठरली. दुखापतीची तमा न बाळगता सी. अरुण या सामन्यात खेळला, पण त्यालाही जास्त प्रभाव पाडता आला नाही. दुखापतीमुळे आतापर्यंत दमदार कामगिरी करणारा सोनू नरवाल यालाही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.
बंगालकडून जँक कुन ली याने चढाईत सर्वाधिक सहा गुण मिळवले, पण बंगालचे वैशिष्टय़ हे पकडीमध्ये असल्याचे गेल्या काही सामन्यांमध्ये समोर आले आहे आणि हेच या सामन्यात पाहायला मिळाले. पकडीमध्ये बंगालकडून गिरीश इर्नाकने पाच, तर नीलेश शिंदे आणि बाजीराव होडगे यांनी प्रत्येकी चार गुण मिळवले.
बंगालच्या ली याने सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला चढाईमध्ये दोन गुण मिळवून देत बंगालचे खाते उघडून २-० अशी आघाडी मिळवून दिली. आठव्या मिनिटापर्यंत बंगालने दमदार खेळ करत ५-२ अशी आघाडी घेतली होती; पण त्यानंतर बंगालने काहीसा संयमी खेळ केला. पण जयपूरच्या सोनू नरवालने दोन पकडींच्या जोरावर संघाला ५-६ असे बंगालच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला; पण १७व्या मिनिटाला राखीव खेळाडू उमेश म्हात्रेने चढाईमध्ये दोन गुण मिळवत संघाची आघाडी वाढवण्याचा प्रयत्न केला. बंगालचा कर्णधार नीलेश शिंदेने उजव्या कोपरारक्षकाची जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडत पकडीमध्ये चार गुण मिळवत संघाला आघाडीवर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. जास्त जोखीम न उचलत बंगालने मध्यंतरापर्यंत ११-८ अशी आघाडी कायम राखली.
मध्यंतरानतर बंगालकडून अधिक आक्रमक खेळ पाहायला मिळाला. सामन्याच्या मध्यंतरानंतर सहाव्याच मिनिटाला बंगालने जयपूरवर पहिला लोण चढवत १७-८ अशी दमदार आघाडी घेतली. त्यानंतर दोन्ही संघांत गुण मिळवण्यात स्पर्धा लागली होती आणि त्यामध्येही जयपूरचा संघ मागे पडला होता. सामन्याच्या ३९व्या मिनिटाला बंगालने जयपूरवर दुसरा लोण चढवला आणि ३०-१७ अशी दमदार आघाडी घेत विजयाच्या दिशेने ठोस पाऊल टाकले. सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला बंगालच्या श्यामकुमार साहाने चढाईमध्ये चार गुण पटकावले आणि बंगालने ३४-१८ असा सहजपणे सामना जिंकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजचे सामने
’ बंगाल वॉरियर्स वि. यु मुंबा
’ जयपूर पिंक पँथर्स वि. पाटणा पायरेट्स
’ वेळ : रात्री ८.०० वाजल्यापासून
’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, ३ आणि २, ३ एचडी वाहिन्यांवर.

आजचे सामने
’ बंगाल वॉरियर्स वि. यु मुंबा
’ जयपूर पिंक पँथर्स वि. पाटणा पायरेट्स
’ वेळ : रात्री ८.०० वाजल्यापासून
’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, ३ आणि २, ३ एचडी वाहिन्यांवर.