प्रो कबड्डी लीगमध्ये आलेल्या नेतृत्वबदलाच्या साथीची लागण बंगाल वॉरियर्सलाही झाली. अनुभवी दिनेश कुमारच्या जागी बंगालने कोरियाच्या यांग कुन ली याच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवली. परंतु नेतृत्वबदलामुळे बंगालच्या कामगिरीत मात्र कोणताही फरक पडला नाही. अजय ठाकूरच्या शानदार चढायांच्या बळावर बंगळुरू बुल्सने गुरुवारी आपल्या सहाव्या विजयाची नोंद करताना बंगालचा ३३-२२ अशा फरकाने पराभव केला. दुसऱ्या लढतीत यजमान तेलुगू टायटन्सने पाटणा पायरेट्सचा ५४-३२ धुव्वा उडवला. टायटन्सच्या विजयात राहुल चौधरीप्रमाणेच लागोपाठच्या चढायांमध्ये प्रत्येकी चार गडी बाद करणाऱ्या इराणच्या मेराज शेखने सिंहाचा वाटा उचलला.
पहिल्या लढतीत तिसऱ्या चढाईलाच गुण मिळवण्याची रणनीती दोन्ही संघांनी आखल्यामुळे या सामन्यात गुणफलकाने धिमी गती धारण केली. बंगळुरूने प्रारंभीपासून आक्रमक पवित्रा स्वीकारला आणि १७व्या मिनिटाला पहिला लोण चढवत मध्यंतराला १६-१० अशी आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात ३५व्या मिनिटाला बंगळुरूने आणखी एक लोण चढवत आरामात विजयावर नाव कोरले. अजयने ३६व्या मिनिटाला एका चढाईत तीन गडी बाद करण्याची किमया साधत सर्वाचे लक्ष वेधून घेतले. अखेरची काही मिनिटे शिल्लक असताना अजयला दुखापत झाली. पण तरीही मोठी आघाडी असल्यामुळे बंगळुरूला जड गेले नाही. अजयने चढायांचे ११ गुण (१ बोनस) आणि पकडीचा एक गुण मिळवला. कर्णधार मनजित चिल्लरने अष्टपैलू खेळाची चुणूक दाखवत चढायांचे ४ आणि पकडींचे ४ गुण मिळवले. बंगालकडून दीपक कुमार आणि नीलेश शिंदे यांनी अप्रतिम पकडी केल्या. दुसऱ्या सामन्यात राकेश कुमारच्या अनुपस्थितीत संदीप नरवालच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या पाटणा संघाने प्रारंभीपासून हाराकिरी पत्करली. त्यामुळे तेलुगू टायटन्सने पहिल्या सत्रात ३८-१२ अशी आघाडी घेतली. राहुलने आणि मेराजने प्रत्येकी ११ गुण मिळवले. दीपक हुडाने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले.