करीम बेंझेमा आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या गोलमुळे रिअल माद्रिदने कोडरेबा संघाचा २-० असा पराभव करून ला लीगा स्पर्धेच्या या मोसमात शानदार सुरुवात केली. मँचेस्टर युनायटेडकडून रिअल माद्रिद संघात सामील झालेल्या अँजेल डी मारियाच्या अनुपस्थितीत मधल्या फळीत ऊर्जेची कमतरता जाणवत होती. पहिल्या अध्र्या तासातच रिअल माद्रिदने सुरेख गोल करत पहिल्या गोलाची नोंद केली. संघात नव्याने दाखल झालेल्या टोनी क्रूस आणि जेम्स रॉड्रिगेझ यांनी पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची चमक दाखवली. कॉर्नरवरून टोनी क्रूसने दिलेल्या क्रॉसवर बेंझेमाने ३०व्या मिनिटाला गोल लगावला. दुसऱ्या सत्रात कोडरेबाला बरोबरी साधण्याची संधी होती. पण गोलरक्षक इकर कसिल्लासने रायडर माटोस आणि फिडेल यांचे प्रयत्न परतवून लावले. ४३ वर्षांनंतर पहिला महत्त्वपूर्ण सामना खेळणाऱ्या कोडरेबाला सुरेख सुरुवात करण्याची संधी होती. पण माइक हॅवेनारने मारलेला फटका गोलजाळ्याच्या बाजूने गेला. पण सामना संपायला काही मिनिटे शिल्लक असताना रोनाल्डोने ३० यार्डावरून गोल करीत रिअल माद्रिदच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा