भारत-इंग्लंड महिला संघांमधील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने ३-० ने जिंकली. या मालिकेतील अंतिम सामन्याची एका वेगळ्याच कारणामुळे चर्चा होत आहे. पूर्वी खेळभावनेविरोधी म्हटल्या जाणाऱ्या आणि आता कायदेशीर अधिष्ठान प्राप्त झालेल्या मंकडिंगच्या मदतीने भारताच्या दिप्ती शर्माने इंग्लंडच्या खेळाडूला बाद करून भारताला सामना जिंकून दिला. दिप्ती शर्माने मिळवलेल्या या विकेटची सध्या जगभरात चर्चा होत आहे. भारताने हा सामना जिंकल्यामुळे इंग्लंडमधील क्रिकेटप्रेमी नाराज आहेत. इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना पाठिंबा देणाऱ्या ‘बर्मी आर्मी’ या ग्रुपनेदेखील दिप्ती शर्माने जे केलं, त्याला क्रिकेट म्हणत नाहीत, अशी भावना व्यक्त केली आहे. बर्मी आर्मीच्या मतानंतर भारतीय क्रिकेटचाहतेही चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी बर्मी आर्मीला जशास तसे उत्तर दिले आहे.
हेही वाचा >>> Video : दिप्ती शर्माने दाखवलेल्या हुशारीला कॅप्टनचा पाठिंबा; इंग्लंडच्या खेळाडूला रडू कोसळले, पण हरमनप्रित म्हणाली…
बर्मी आर्मीच्या ट्वीटनंतर भारतीयांनी दिलं जशास तसं उत्तर
भारताने सामना जिंकल्यानंतर बर्मी आर्मीने एक ट्वीट केलं. दिप्तीने ज्या पद्धतीने इंग्लंडच्या खेळाडूला बाद केले ते नियमांना धरूनच आहे. पण तिने जे केले ते खरे क्रिकेट नाही. खेळ संपवण्याची ही एक चुकीची पद्धत आहे, असे बर्मी आर्मीने ट्वीट केले. त्यानंतर भारतीयांनी बर्मी आर्मी ग्रुपला जशास तसे उत्तर दिले.
सामन्यामध्ये नेमकं काय घडलं होतं?
इंग्लंड संघाकडून शार्लोट डीन ही एकटी किल्ला लढवत होती. तिने ८० चेंडूंमध्ये ४७ धावा केल्या. होत्या. मात्र ४३ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर भारतीय गोलंदाज दिप्ती शर्माने क्रिकेटच्या नियमांचा पुरेपूर उपयोग करून घेतला. दिप्ती शर्माने चेंडू फेकण्याआधीच नॉन स्ट्राईकवर असलेल्या शार्लोट डीनने क्रीझ सोडले. हीच संधी साधत दिप्तीने शार्लोट डीनला धावबाद केले. याआधी फलंदाजाला अशा प्रकारे बाद करण्याला मंकडिंग म्हटले जायचे. विशेष म्हणजे मंकडिंग हे खेळभावनेविरोधी असल्याचा म्हटले जायचे. मात्र आता गोलंदाजाने फलंदाजाला अशा प्रकारे बाद केले, तर त्याला अधिकृतपणे धावबाद म्हणून बाद दिले जाते. याच बदललेल्या नियमांचा आधार घेत दिप्तीने शार्लोट डीनला धावबाद केले आणि सामन्यात विजय मिळवला.
भारतीयांनी बर्मी आर्मीला ‘अशी’ उत्तरं दिली
दरम्यान, भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रित कौरने दिप्तीला पाठिंबा दिला आहे. दिप्तीने क्रिकेटमधील नियमानुसारच बळी घेतला, अशी प्रतिक्रिया कौरने दिली आहे.