ब्रिजटाऊन (बार्बाडोस) : गेल्या वर्षी मायदेशात एकदिवसीय विश्वचषक विजयाने हुलकावणी दिल्यानंतर अत्यंत भावूक झालेल्या रोहित शर्माने काही महिन्यांतच भारताला ट्वेन्टी-२० विश्वचषक मिळवून देण्याचे ध्येय बाळगले होते. अथक मेहनत, गुणवान खेळाडूंची साथ, प्रशिक्षक राहुल द्रविडसह आखलेल्या अचूक योजना यामुळे रोहितने हे ध्येय साध्य केलेच. भारताला ट्वेन्टी-२० विश्वचषक मिळवून देणारा तो महेंद्रसिंह धोनीनंतरचा दुसरा कर्णधार ठरला. ‘‘माझ्या कारकीर्दीतील हा सर्वोत्तम क्षण आहे. मला काहीही करून विश्वचषक उंचवायचा होता,’’ अशी भावना रोहितने व्यक्त केली.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत भारताने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करताना ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले. यासह भारताची २०१३ पासूनची ‘आयसीसी’ जेतेपदाची प्रतीक्षा संपली. ‘‘गेल्या अनेक वर्षांपासून भारतासाठी मी ज्या धावा केल्या, त्याला महत्त्व आहे. मात्र, मी आकड्यांकडे फारसा पाहत नाही. माझ्यालेखी, भारताला सामने आणि विविध स्पर्धा जिंकवून देणे, हे सर्वांत महत्त्वाचे आहे. मी याचीच आतुरतेने वाट पाहत असतो. त्यामुळे अखेर विश्वचषक उंचावण्याची संधी मिळाल्याचा खूप आनंद आहे,’’ असे रोहितने अंतिम सामन्यानंतर नमूद केले.
बार्बाडोस येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दिलेल्या १७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला अखेरच्या ३० चेंडूंत ३० धावांचीच आवश्यकता होती. मात्र, हार्दिक पंड्या (३/२०), जसप्रीत बुमरा (२/१८) आणि अर्शदीप सिंग (२/२०) यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करताना भारताला अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला. परंतु भारतीय संघाला केवळ एका सामन्यातील कामगिरीमुळे नाही, तर गेल्या तीन-चार वर्षांत घेतलेल्या मेहनतीमुळे हे यश मिळाल्याचे रोहित मानतो.
हेही वाचा >>> Rohit Sharma: T20 विश्वचषकासह रोहित शर्माची ‘गुड मॉर्निंग’, ट्रॉफीसह काढलेला सेल्फी व्हायरल
‘‘मी माझ्या भावना शब्दांत मांडू शकत नाही. अंतिम सामन्याच्या आदल्या दिवशी मी झोपूही शकलो नाही. मला काहीही करून हे विश्वविजेतेपद मिळवायचे होते. गेल्या तीन-चार वर्षांत आम्हाला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला आहे. पडद्यामागे आम्ही प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याच मेहनतीचे हे फळ आहे. आम्हाला एका दिवसात किंवा केवळ अंतिम सामन्यातील कामगिरीने हे यश मिळालेले नाही. आमच्या या यशाचे श्रेय संघ व्यवस्थापन, प्रशिक्षक आणि खेळाडू अशा सर्वांनाच जाते,’’ असे रोहितने नमूद केले.
आयुष्यभराची आठवण
मला खेळाडू म्हणून विश्वचषक उंचवायचे कधी भाग्य लाभले नाही. मात्र, आता प्रशिक्षक म्हणून ही कामगिरी करता आल्याचा निश्चित आनंद आहे. माझ्यासाठी ही आयुष्यभराची आठवण आहे, अशी प्रतिक्रिया राहुल द्रविडने व्यक्त केली. भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून ही द्रविडची अखेरची स्पर्धा होती. त्यामुळे भारतीय खेळाडूंनी द्रविडला उत्फूर्तपणे उचलून आनंद साजरा केला.
प्रथितयश त्रिकुटाचा अलविदा
ब्रिजटाऊन : भारतीय संघाच्या विश्वविजयानंतर कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा या प्रथितयश त्रिकुटाने आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटला अलविदा केले.
कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अंतिम लढतीत ७६ धावांची निर्णायक खेळी केली. त्यानेच सर्वप्रथम निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. ‘‘ही माझी अखेरची ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा होती आणि मला असाच शेवट करायचा होता. हा माझा भारतासाठी अखेरचा ट्वेन्टी-२० सामना होता. त्यामुळे आता नाही, तर कधीच नाही असा मी विचार केला. सर्वोत्तम कामगिरीचा माझा प्रयत्न होता. आता पुढच्या पिढीने जबाबदारी घेण्याची वेळ आली आहे,’’ असे कोहली म्हणाला.
त्यानंतर पत्रकार परिषदेत रोहितनेही आपली निवृत्ती जाहीर केली. ‘‘हा माझाही अखेरचा आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामना होता. मला विश्वचषक काहीही करून जिंकायचा होता. आम्ही अंतिम रेष पार करू शकलो याचा खूप आनंद आहे,’’ असे ३७ वर्षीय रोहितने सांगितले.
भारताच्या विश्वचषक विजयाच्या एका दिवसानंतर जडेजाने ‘इन्स्टाग्राम’वरून आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटला अलविदा केले. ‘‘कृतज्ञतेने भरलेल्या अंत:करणाने, मी आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटला निरोप देत आहे. मी माझ्या देशासाठी नेहमीच सर्वस्व पणाला लावले आणि इतर प्रारूपांमध्ये ते पुढेही करत राहीन,’’ असे जडेजाने लिहिले.
ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी
रोहितने १५९ सामन्यांत ४२३१ धावा केल्या, ज्यात पाच शतके आणि ३२ अर्धशतकांचा समावेश होता. आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतके असे विक्रम त्याच्या नावे आहेत. कोहलीने १२५ सामन्यांत ४८.६९च्या सरासरीने ४१८८ धावा केल्या. डावखुऱ्या जडेजाने ७४ सामने खेळताना ५१५ धावा केल्या आणि ५४ गडीही बाद केले.