लंडन :  टेनिस कारकीर्दीचा निरोप घेताना अखेरचा सामना राफेल नदालच्या साथीने खेळायला मिळणे, हा सर्वात मोठा क्षण असल्याचे रॉजर फेडररने बुधवारी म्हटले आहे.

रॉड लेव्हर चषक टेनिस स्पर्धेनंतर निवृत्त होण्याचा निर्णय रॉजर फेडररने यापूर्वीच घेतला आहे. या स्पर्धेस शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. या लढतीसाठी फेडरर त्याच्या टीम युरोपला येऊन मिळाला असून, सहकारी स्टेफानोस त्सित्सिपासच्या साथीने फेडररने सराव केला. बियोन बोर्ग या संघाचा कर्णधार आहे.

या स्पर्धेतील दुहेरीची लढत फेडररची निरोपाची लढत असणार आहे. या लढतीत फेडरर नदालच्या साथीने खेळणार आहे. अखेरच्या पत्रकार परिषदेत बोलताना फेडररने कारकीर्दीमधील शेवटचा सामना नदालच्या साथीने खेळायला मिळण्यापेक्षा दुसरा सर्वोत्तम क्षण असूच शकत नाही, असे सांगितले

पत्रकार परिषदेला फेडररचे जोरदार स्वागत झाले. तो म्हणाला, ‘‘तुम्हाला कायम खेळत राहावे असेच वाटत असते. मीदेखिल टेनिसवर तेवढेच प्रेम केले. खेळणे आणि त्यासाठी करावा लागणारा प्रवास याचा कधीच कंटाळा केला नाही. कारकीर्दीत मिळालेल्या पराभवातून शिकत गेलो. कारकीर्दीच्या प्रत्येक क्षणावर मी प्रेम केले. माझ्या आजपर्यंतच्या टेनिस प्रवासावर मी समाधानी आहे.’’

सध्या तरी फक्त कुटुंब आणि वाचन

निवृत्तीच्या निर्णयानंतर काय करणार हे फेडररने अजूनपर्यंत सांगितले नाही. मात्र, आज त्याने पूर्ण वेळ कुटुंबाला देणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर या लढतीनंतर मोठय़ा सुटीवर जाणार आणि त्यानंतर घरी परतल्यावर माझे काही जुने सामने पाहणार. त्याचबरोबर माझ्याविषयी जे काही लिहून आले हे ते वाचून काढणार. जे कारकिर्दीत मी कधीच वाचलेले नाही, असे फेडरर म्हणाला.

Story img Loader