प्रत्येक सामन्यात, स्पर्धेत सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा ध्यासच मला प्रेरणा देतो, असे मत भारताचा अनुभवी टेनिसपटू लिएण्डर पेसने व्यक्त केले. चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेत पेसने अंतिम फेरीत धडक मारली, मात्र त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पराभव खेळाचा भाग आहे, मात्र प्रत्येक लढतीतील सकारात्मक गोष्टींवरच लक्ष केंद्रित करत असल्याचे पेसने सांगितले.
‘‘मुलगा, वडील, क्रीडापटू अशा विविध भूमिकांना न्याय देणे माझे कर्तव्य आहे. प्रत्येक दिवशी मला माझ्यात आणखी सुधारणा व्हावी असे जाणवते. काही दिवसांतच मी ४२ वर्षांचा होणार आहे. वय हा केवळ भौतिक मुद्दा आहे. आयुष्यात येणारे अडथळे आपण थांबवू शकत नाही. मात्र त्यांची तीव्रता कमी करण्याचे काम आपण करू शकतो. विनाकारण रागावून, निराश होऊन काहीही साध्य होत नाही. आपला निकोप दृष्टिकोनच गोष्टी बदलवू शकतो. रॅकेटनेच उत्तर देणे मला आवडते,’’ असे पेस म्हणाला.
पत्नी रिया पिल्लेशी सुरू असलेला पेसचा कौटुंबिक कलह न्यायालयात गेला असून, या वादामुळे पेसच्या कामगिरीवर परिणाम झाला होता. मात्र त्यातून सावरत पेसने नुकत्याच झालेल्या चेन्नई स्पर्धेत दिमाखदार कामगिरी केली.
तो पुढे म्हणाला, ‘‘आपल्या देशात प्रतिकूल गोष्टी खूप आहेत. तत्त्व आणि जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. सत्याच्या बाजूने राहण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी लागते. ब्रेन टय़ूमरच्या आजाराने त्रस्त असताना मी पुन्हा टेनिस खेळू शकेन की नाही याची शाश्वती नव्हती. मात्र मी संयम बाळगला.’’
टीकाकारांना महत्त्व देऊ नये. विधायक टीका कामगिरीसाठी प्रोत्साहन देऊ शकते. मात्र असंख्य सकारात्मक गोष्टी  आजूबाजूला असताना अनाठायी टीकेला महत्त्व देऊ नये.
भारतातील टेनिसच्या स्थितीविषयी विचारले असता पेस म्हणाला, ‘‘टेनिस खेळणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र त्यांचा दर्जा सुधारणे अत्यावश्यक आहे. याआधी केवळ २-३ खेळाडूच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना दिसत होते. मात्र आता १४-१५ खेळाडू तयार झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थिरावण्यासाठी सातत्याने खेळात सुधारणा करणे अत्यावश्यक आहे.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा