जमैकाच्या उसेन बोल्टने आपणच जगातील सर्वात जलद व्यक्ती असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. पुरेशा विश्रांतीनंतर नवीन आव्हानांसाठी सज्ज झालेल्या बोल्टच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष लागले होते. जागतिक अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पध्रेत त्याच्यासमोर अमेरिकेच्या जस्टीन गॅटलीन याचे कडवे आव्हान असल्यामुळे बोल्ट १०० मीटरचे जेतेपद कायम राखते को गॅटलीन बाजी मारतो याची उत्सुकता सर्वाना होती. परंतु, बोल्टने ९.७९ सेकंदात १०० मीटरचे अंतर पूर्ण करून जेतेपद कायम राखले. मात्र, गॅटलीनकडून त्याला कडवी टक्कर मिळाली, हे नाकारून चालणार नाही. गॅटलीनने ९.८० सेकंदाज शर्यत पूर्ण केली. अवघ्या ०.१ सेकंदाच्या फरकाने गॅटलीनचे सुवर्णपदक हुकले. कॅनडाचा अॅड्रे डे ग्रासे (९.९२ से.) आणि अमेरिकेचा ट्रायव्हॉन ब्रोमेल (९.९२ से.) यांनी समान वेळ नोंदविल्यामुळे संयुक्तरित्या कांस्यपदक देण्यात आले.
हेप्टॅथलॉनमध्ये जेसिकाला सुवर्ण ; चालण्याच्या शर्यतीत लोपेझ विजेता
इंग्लंडच्या जेसिका एनिस हिल हिने हेप्टॅथलॉनमध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदकापाठोपाठ येथे जागतिक मैदानी स्पर्धेतील विजेतेपदावर मोहोर नोंदविली. स्पेनच्या मिग्वेल अँजेल लोपेझ याने वीस किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत विजेतेपद मिळवित चीनच्या प्रेक्षकांची निराशा केली.
दुखापतींमुळे संघर्ष करावा लागलेल्या जेसिका हिने ६ हजार ६६९ गुणांसह अजिंक्यपद पटकाविले. कॅनडाच्या ब्रिएनी थिसेन ईटॉन हिने रौप्यपदक मिळविताना ६ हजार ५५४ गुणांची कमाई केली. लॅटवियाच्या लॉरा इकॉनैसी अॅडमिदिना हिने कांस्यपदक मिळविले. तिला ६ हजार ५१४ गुण मिळाले. जेसिकाची सहकारी कॅटरिना जॉन्सन थॉम्पसनला पदकापासून वंचित राहावे लागले. लांब उडीत तिने तीनही प्रयत्नांच्या वेळी फाउल केले. सुरुवातीला इंग्लंडच्या संघव्यवस्थापकांनी तिच्या फाउलबद्दल आक्षेप नोंदविण्याचा निर्णय घेतला होता मात्र पडद्यावर त्याचे चित्रीकरण पाहिल्यानंतर त्यांनी आक्षेप घेतला नाही.पुरुषांच्या वीस किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत चीनची मक्तेदारी मानली जाते. मात्र स्पॅनिश खेळाडू लोपेझ याने ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता वाँग झेन (चीन) याच्यावर मात करीत हे यश मिळविले. युरोपियन विजेत्या लोपेझने ही शर्यत एक तास १९ मिनिटे १४ सेकंदात पार केली. वाँग याने हे अंतर एक तास १९ मिनिटे २९ सेकंदात पार करीत रौप्यपदक पटकाविले. कॅनडाच्या बेंजामिन थॉर्न याला कांस्यपदक मिळाले. त्याला ही शर्यत पार करण्यास एक तास १९ मिनिटे ५७ सेकंद वेळ लागला. विश्वविक्रमवीर युसुकी सुझुकी या जपानच्या खेळाडूला ही शर्यत पूर्ण करण्यात अपयश आले. घोटय़ातील स्नायू दुखावल्यामुळे त्याने दहाव्या किलोमीटरला ही शर्यत सोडून दिली.पोलंडच्या पॉव्हेल पाज्देक याने हातोडाफेकीत सोनेरी कामगिरी केली. त्याने ८०.८८ मीटपर्यंत हातोडा फेकला. ताजिकिस्तानचा दिलशाद नाझारोव्ह याने रौप्यपदक मिळविले. पोलंडचाच वोजिसिघ नोविकी याने कांस्यपदक मिळविले. हंगेरीचा ऑलिम्पिक व युरोपियन विजेता ख्रिस्तियन पार्स याला पदक मिळविण्यात अपयश आले. त्याने २०११ व २०१३ मध्ये या स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते.
वेगाचा अनभिषिक्त सम्राट
जमैकाच्या उसेन बोल्टने आपणच जगातील सर्वात जलद व्यक्ती असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-08-2015 at 06:34 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best speed runner