Australia Women vs South Africa Women T20 WC Final Match: ऑस्ट्रेलियाची सलामीवीर बेथ मुनीने रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध महिला टी-२० विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावून इतिहास रचला. ऑस्ट्रेलियन संघासाठी नाणेफेक जिंकून डावाची सुरुवात करणाऱ्या मुनीने ४४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याचबरोबर महिला टी२० विश्वचषकाच्या इतिहासातील अंतिम सामन्यात दोन अर्धशतके झळकावणारी ती जगातील पहिली खेळाडू ठरली.
बेथ मुनीने ५३ चेंडूत ७४ धावांची खेळी केली. तिने आपल्या खेळीच ९ चौकार आणि एक गगनचुंबी षटकार लगावला. त्याचबरोबर संघाला २० षटकांत ६ बाद १५६ धावांपर्यंत नेण्यात मोलाची भूमिका बजावली. २०२० मध्ये झालेल्या महिला टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात बेथ मुनीने भारताविरुद्ध ७८ धावांची नाबाद खेळी केली होती. यावेळी ती ७४ धावा करून नाबाद राहिली. मुनीने १३९.६२च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली आणि संघाला सुरक्षित धावसंख्या गाठून दिली.
विश्वचषकातील तिसरी सर्वोच्च धावसंख्या –
महिला टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सर्वात मोठी खेळी खेळण्याचा विक्रम बेथ मुनीच्या नावावर आहे. रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद ७४ धावांची खेळी करून ती स्वत:च्याच विक्रमाची बरोबरी करण्यास मुकली. २०२० मध्ये तिने भारताविरुद्ध नाबाद ७८ (५४) खेळून विश्वविक्रम आपल्या नावावर केला. याच सामन्यात ३९ चेंडूत ७५ धावा करणारी एलिसा हिली या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. रविवारी आपल्या अर्धशतकासह, मुनीने विश्वचषक फायनलमधील सर्वात मोठ्या खेळीच्या यादीत पहिले आणि तिसरे स्थान गाठले आहे.
सलग दुसऱ्यांदा विश्वचषकात बॅटने धमाका केला –
सलग दुसऱ्यांदा महिला टी-२० विश्वचषकात बेथ मुनीची कामगिरी प्रभावी ठरली आहे. मुनीने ५१.५० च्या प्रभावी सरासरीने आणि ११७.७१ च्या स्ट्राइक रेटने २०६ धावा केल्या आहेत, टूर्नामेंटच्या ६ सामन्यांच्या ६ डावांमध्ये दोनदा नाबाद राहिली आहे. ती स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत इंग्लंडच्या नताली स्कायव्हर (२१६) नंतर दुसऱ्या स्थानावर होती. २०२० मध्ये, मूनीने विश्वचषक स्पर्धेत ६ सामन्यांमध्ये ६४.७५च्या सरासरीने आणि १२५.१२च्या स्ट्राइक रेटने २५९ धावा केल्या. दोन्ही वेळा तिच्या बॅटमधून ३-३ अर्धशतके झळकली आहेत.