आयपीएल सट्टेबाजी प्रकरणावरून राजस्थान रॉयल्सचे सह-मालक राज कुंद्रा यांचे निलंबन करण्याचा निर्णय बीसीसीआयच्या नवी दिल्लीतील तातडीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यांच्यावर गरज पडल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत बीसीसीआयकडून याआधीच देण्यात आले होते.
राजस्थान रॉयल्सचे हिस्सेदार कुंद्रा यांनी सट्टेबाजी केल्याची कबुली दिल्याचे दिल्ली पोलिसांनी जाहीर केल्यानंतर बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “राज कुंद्रा प्रकरणावर बैठकीत सखोल चर्चा झाली, त्यानंतर कुंद्रा आरोपांतून मुक्त होईपर्यंत त्यांना निलंबित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच ते निर्दोष असल्याचे सिद्ध झाल्यास त्यांना पुन्हा आपली पत मिळवता येईल”  
कुंद्रावरील आरोप सिद्ध झाल्यास राजस्थान रॉयल्सची आयपीएलमधून हकालपट्टी करण्यात येईल. हे संकट टाळण्यासाठी संघ व्यवस्थापनाने आधीच कुंद्रापासून अंतर ठेवण्यास प्रारंभ केला आहे तसेच नियमांचा भंग केल्यास कुंद्रा यांना आपली हिस्सेदारी गमवावी लागेल, असे राजस्थान रॉयल्सकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Story img Loader