कबड्डी क्षेत्रातील आमदार भाई जगताप यांच्या वाढत्या घुसखोरीला अखेर चाप बसलाय! तोही आरसीफएच्या निमंत्रितांच्या अखिल भारतीय कबड्डीच्या उद्घाटनात अन् सुमारे सातशे-आठशे प्रेक्षकांच्या साक्षीने!
आपल्या कार्यक्षेत्राबाहेरील, आपल्या हद्दीबाहेरील राकेफ ऊर्फ राष्ट्रीय केमिकल्स व फर्टिलायझर्स ऊर्फ आरसीएफच्या मैदानात या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी भाई जगताप यांनी मुंबई उपनगरच्या हद्दीत घुसखोरी केली. एवढेच नव्हे तर आरसीएफचे कॉर्पोरेट ऑफिस मुंबई शहरात व सायनमध्ये आहे, असा सर्वस्वी खोटा दावा पत्रकार परिषदेत वारंवार तावातावाने केला, पण आरसीएफबाबतच्या ४१ वर्षांपूर्वीच्या नोंदीनुसार एकशे तीन एकरांचा हा भूखंड कुर्ला तालुक्यातच येतो, या गौप्यस्फोटाने त्या दाव्याचे खोटारडेपण चव्हाटय़ावर आले. तिथूनच भाईंच्या घुसखोरीला चाप बसण्यास सुरुवात झाली.
उपनगरातील चेंबूरमध्ये व कुर्ला तालुक्यात होणाऱ्या आरसीएफ स्पर्धेचे संयोजन पुढल्या वर्षी (अर्थातच पुढच्या वर्षांपासून!) मुंबई उपनगर कबड्डी संघटनेकडे दिले जावे, अशी सूचना उपनगर संघटनेचे अध्यक्ष गजानन कीर्तिकर यांनी केली. उद्घाटक गजानन कीर्तिकर यांची ही सूचना आरसीफएचे सीएमडी राजन यांनी उचलून धरली. आपल्या घुसखोरीस लगाम घातला जात असताना, व्यासपीठावरील भाई जगताप चेहरा हसरा ठेवण्याचे प्रयत्न करत होते. त्यांच्या शेरोशायरीला एकही टाळी पडली नाही!
५० लाख, ३६ लाख!
महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती करंडक स्पर्धेचा मुखवटा आपल्या राष्ट्रीय कबड्डीच्या संयोजनास भाई जगताप यांनी याआधी चढवला आणि पन्नास लाख रुपयांचा पुरस्कार लाटला होता. मराठवाडा, कोकण, विदर्भ, सातारा या मागासलेल्या महाराष्ट्रातील कबड्डी संघटनांच्या हातातोंडाशी आलेला घास, त्यामानाने सधन असलेल्या मुंबई शहर जिल्हा संघटनेच्या नावाने हस्तगत केला होता. आता सव्‍‌र्हिस-टॅक्ससह सुमारे ३६ लाख रुपयांचा आरसीएफ पुरस्कार त्यांनी उपनगर संघटनेच्या हातून पळवला. या कारवायांना आता चाप बसत आहे.
गंमतीची गोष्ट म्हणजे, आरसीएफचे कॉर्पोरेट ऑफिस मुंबई शहर संघटनेच्या हद्दीत आहे, असा दावा अध्यक्ष भाई जगताप करत होते, पण दुसरीकडे त्यांचे विश्वासू सहकारी उपनगराच्या कक्षेतील मैदानात स्पर्धा घेण्याबद्दल दहा हजार रुपये रॉयल्टी उपनगराकडे भरत होते. हे व्यवहार किती दुटप्पी व दुतोंडे!
माजी मंत्री गजानन कीर्तिकर यांनी उद्घाटन समारंभात या गोष्टींचा निषेध करण्याऐवजी प्रोटोकॉल पाळण्याचे सौजन्य वा पड खाण्याची वृत्ती दाखवली. भाऊ (गजाननभाऊ) व भाई (भाई जगताप) मैदानात एक आहेत असे सांगितले. ‘भाई-भाऊ भाई-भाई’च्या या समंजस वा पडखाऊ धोरणास भाईंनी प्रतिकार कोणता दिला? पत्रकार परिषदेत आपण खोटारडे दावे केले ही चूक उघडपणे मान्य करण्याचा समंजसपणा दाखवला का? तूर्त तरी ‘भाई-भाऊ भाई-भाई’ हा नारा एकतर्फीच ठरला!
पाठपुरावा
समारंभानंतर उपनगर संघटनेचे अध्यक्ष कीर्तिकर म्हणाले, ‘‘ही स्पर्धा व उपनगर चाचणी स्पर्धा संपल्यानंतर मी आरसीएफच्या अधिकाऱ्यांची भेट घेईन. राज्य कबड्डी संघटनेसही आम्ही भेटू. हा प्रश्न सरळ साधा आहे. लवकरात लवकर तो निकालात काढण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू.
कबड्डी ऑलिम्पिकमध्ये नेण्याची सवंग घोषणा, मुंबापुरीत व्यावसायिक राष्ट्रीय कबड्डी व राष्ट्रीय कबड्डीपाठोपाठ चेंबूरलाही झाली, पण उद्घाटन सोहळ्यातील स्वागत समारंभ, भाषणबाजी आणि ओढूनताणून बसवलेले तथाकथित करमणूक कार्यक्रम, क्रिकेट कसोटी सामन्याआधी कधी प्रेक्षकांवर लादले जातात का? या प्रश्नास संयोजक भाईंकडे कोणते उत्तर आहे?
लेझीम, बॅण्ड आदी आटोपशीर कार्यक्रम, दोन फेऱ्यांमधील दहा मिनिटांच्या विश्रांतीत दाखवणे त्यापेक्षा श्रेयस्कर ठरेल.
स्पर्धेचा संपूर्ण कार्यक्रम, उद्घाटनाआधी तीन दिवस देण्याचे आश्वासन भाईंनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिले होते, पण प्रत्यक्षात उद्घाटन सोहळा संपला तरीही कार्यक्रम पत्रकारांना दिला गेला नव्हता. तामिळनाडू संघ केव्हा मुंबईत दाखल होणार याचीच चर्चा त्याऐवजी चालू होती. अशा गलथान भाईंनी कशाला ऑलिम्पिकचे नाव घ्यावे? ऑलिम्पिकचा तपशीलवार कार्यक्रम ऑलिम्पिकआधी किती दिवस वेबसाइटवर असतो, याची माहिती भाईंनी प्रथम करून घ्यावी.
पुढाऱ्यांच्या या हावरटपणातून व खोटारडेपणातून आरसीएफचे उच्चशिक्षित अधिकारी कोणता बोध घेणार आहेत?
किमानपक्षी कबड्डी ते व्हॉलीबॉलपर्यंतच्या साऱ्या खेळांत आपला संघ मुंबई उपनगर संघटनेलाच संलग्न करण्याचे आदेश त्यांनी तातडीने काढले पाहिजेत आणि असली घुसखोरी कायमचीच बंद केली पाहिजे.

Story img Loader