भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी मंगळवारची (१६ ऑगस्ट) सकाळ एक वाईट बातमी घेऊन आली. आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर (एआयएफएफ) निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईबाबत भारतीय क्रीडा विश्वातील विविध तज्ज्ञांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुतियाच्या मते, फिफाने घेतलेला निर्णय फार कठोर आहे. मात्र, भारताने या कारवाईकडे एक संधी म्हणून बघितले पाहिजे.
भारतीय फुटबॉल महासंघात (एआयएफएफ) ‘तिसऱ्या पक्षाचा’ हस्तक्षेप वाढला असल्याचे कारण देऊन फिफाने तात्काळ निलंबनाची कारवाई केली आहे. याचा सर्वात पहिला फटका १७ वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाला बसला आहे. ११ ते ३० ऑक्टोबर दरम्यान भारतात १७ वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धेचे आयोजन होणार होते. मात्र, एआयएफएफवर कारवाई झाल्याने स्पर्धेचे भवितव्य सध्या अधांतरी आहे.
फिफाच्या या कारवाईबाबत भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुतियाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. पीटीआयशी बोलताना भुतिया म्हणाला, “भारतावर बंदी आणणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. हा एक कठोर निर्णय आहे. मात्र, खेळासाठी योग्य यंत्रणा बसवण्याची हीच उत्तम संधी आहे”.
भारतीय फुटबॉलच्या भल्यासाठी सर्व भागधारकांनी एकत्र येणे आणि योग्य यंत्रणा बनवणे महत्त्वाचे आहे, असे भुतियाला वाटते. याबद्दल बोलताना तो म्हणाला, “भारतीय महासंघ आणि राज्य संघटना यांनी एकत्र येऊन व्यवस्थेतील दोष दूर करण्यासाठी काम करावे. प्रत्येकाने भारतीय फुटबॉलच्या भल्यासाठी काम करावे.”
हेही वाचा – FIFA suspends AIFF: ‘फिफा’चा भारताला मोठा धक्का, फुटबॉल महासंघावर निलंबनाची कारवाई
भारतीय फुटबॉल महासंघाचे माजी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल कार्यकाळ संपल्यानंतरही पदावर राहिले. तेव्हापासून सर्व गोंधळाला सुरुवात झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने पटले यांना पदावरून हटवत महासंघाचे प्रशासकीय मंडळ बरखास्त केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाकडे फिफाने आपल्या नियमांची पायमल्ली म्हणून बघितले आणि एआयएफएफवर निलंबनाची कारवाई केली.