एम.एस.के प्रसाद यांच्या निवड समितीने काही दिवसांपूर्वी भारतीय संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकांच्या नावांची नेमणूक केली. अपेक्षेप्रमाणे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर.श्रीधर यांची फेरनेमणूक करण्यात आली. मात्र विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभव स्विकारल्याचा फटका, फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांना बसला. संजय बांगर यांच्या जागेवर निवड समितीने विक्रम राठोड यांची नेमणूक केली आहे.
संजय बांगर हे भारतीय संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकासोबत सहाय्यक प्रशिक्षकाचीही भूमिका बजावत होते. मात्र त्यांच्या जाण्यानंतर हे पद गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारताची गोलंदाजी सुधारण्यामध्ये भारत अरुण यांचा महत्वाचा वाटा आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी भारतात परतल्यानंतर याबद्दल अधिकृत निर्णय घेण्यात येणार आहे.