सन्मित्र मंडळ आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत भारत पेट्रोलियमने व्यावसायिक गटाचे तर शिवशक्तीने महिला गटाचे जेतेपद पटकावले. देवगड येथील इंदिराबाई ठाकूर कला-क्रीडा नगरीत झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात भारत पेट्रोलियमने महिंद्राचा २६-८ असा सहज पराभव केला. महिंद्राने सातव्या मिनिटालाच महिंद्रावर लोण देत ११-३ अशी आघाडी घेतली. मध्यंतरानंतर पेट्रोलियमच्या सूरजीत सिंगने एकाच चढाईत महिंद्राचे तीन गडी टिपले.
मध्यंतरानंतर दुसरा लोण चढवत भारत पेट्रोलियमने २२-७ अशी आघाडी घेतली आणि सामना १७ गुणांनी आरामात जिंकला.
महिलांच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या शिवशक्तीने सुवर्णयुगला १२-९ असे हरवत जेतेपदावर नाव कोरले. बलाढय़ शिवशक्तीला सुवर्णयुगच्या उदयोन्मुख खेळाडूंनी चांगली लढत दिली. सुवर्णा बारटक्केचा अष्टपैलू खेळ तसेच तिला लाभलेली तेजस्विनी शिंदेची साथ यामुळे शिवशक्तीने मध्यंतराला ७-६ अशी आघाडी घेतली होती.
उत्तरार्धात संयमी खेळ करत त्यांनी ३ गुणांनी विजय मिळवला. भारत पेट्रोलियमचा सूरजित सिंग पुरुषांत तर सुवर्णयुगची ईश्वरी कोंडाळकर महिलांमध्ये सर्वोत्तम खेळाडू ठरले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharat petroleum and shiv shakti win in kabbadi match