वानखेडेवरच्या सचिनच्या भावूक मनोगतातून पाणावलेले डोळे घेऊन परतीला निघालेल्या चाहत्यांच्या चेहऱयावर हसू फुलेल असे ‘ग्रॅन्ड सरप्राईज’ सचिनला देण्यात आले आहे. देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच भारतरत्न पुरस्काराने सचिनला सन्मानित करण्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले आहे.
सचिनचे मनोगत..अन् अवघ्या वानखेडेच्या डोळ्यात पाणी
सचिन..नावाच्या या विक्रमवीराने जाता जाता..आणखी विक्रम केला आहे. भारतरत्न पुरस्काराचा मानकरी ठरणारा सचिन तेंडुलकर पहिला खेळाडू आहे. तसेच सचिन सर्वात कमी वयाचा भारतरत्न पुरस्काराचा सन्मान मिळविणारा ठरला आहे. 
याआधी क्रीडा क्षेत्राचा भारतरत्नासाठी विचार केला जावा का? यावर मतभेद सुरू होते. अखेर कमालीची गुप्तता बाळगून सचिनला निवृत्ती दिवशीच भारतरत्न पुरस्कार जाहीर करून रसिकांचा आनंद द्विगुणीत केला आहे.
* पुरस्कार आईला समर्पित
वानखेडेवरून भारतीय संघ ताज हॉटेलमध्ये परतत असताना वानखेडे ते ताज रस्त्याच्या दोन्ही बाजूला चाहत्यांनी गर्दी केली होती. सचिनही सर्व चाहत्यांना हात दाखवून आभार व्यक्त करत होता. हॉटेलवर पोहोचताच त्याला भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याचे समजले. त्यापुढील प्रतिक्रीयेवर सचिनने हा पुरस्कार आपल्या आईला म्हणजेच रजनी तेंडुलकर यांना समर्पित केला.
* महाराष्ट्राची आठ भारतरत्ने-
१.  महर्षी धोंडो केशव कर्वे
२. संस्कृत विद्वान पां.वा काणे
३. आचार्य विनोबा भावे
४. डॉ.बाबासाहेब आंबेडकर
५. उद्योगपती जे.आर.डी टाटा
६. गाण कोकिळा लता मंगेशकर  
७. पंडित भीमसेन जोशी
८. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर

येत्या २६ जानेवारी २०१४ प्रजासत्ताक दिनी सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Story img Loader