ग्रेस फिटनेसच्या भास्कर कांबळीने एकापेक्षा एक अशा सरस असलेल्या खेळाडूंवर सहज मात करीत मुंबई महानगर पालिकेचा पुरस्कार लाभलेल्या प्रतिष्ठेच्या मुंबई महापौर श्री २०१९ वर आपले नाव कोरले आणि शरीरसौष्ठव हंगामाचा आपला शेवट दणदणीत केला. पालिकेकडून केवळ दीड लाखांचा तुटपंजा निधी मिळाला असतानाही बृहन्मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि उपनगर बॉडीबिल्डींग आणि फिटनेस असोसिएशन यांनी पुन्हा एकदा दमदार शरीरसौष्ठव स्पर्धा घेण्याचे धाडस दाखवले.
सर्वत्र निवडणूकांची रणधुमाळी सुरू असल्यामुळे या स्पर्धेला फारसे कॉर्पोरेट तसेच राजकीय बळही लाभू शकले नाही. तरीही संघटनेचे अध्यक्ष अमोल कीर्तीकर आणि अजय खानविलकर यांनी पुन्हा एकदा शरीरसौष्ठव खेळाला आर्थिक बळ दिले. क्रीडाप्रेमी संतोष राणे यांनी केलेल्या सहकार्यामुळे अनंत अडचणी येऊनही यंदाही मुंबई महापौर श्री स्पर्धा मोठ्या दिमाखात पार पडल्याचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी सांगितले. आमचा खेळ असंख्य क्रीडाप्रेमी संघटक आणि हितचिंतकांमुळे आर्थिकदृष्ट्या चांगलाच सक्षम झाल्याचेही सावंत म्हणाले.
कांदिवली येथील श्याम सत्संग भवन हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत मुंबई व उपनगरातील खेळाडू मोठ्या संख्येने उतरले होते. प्रत्येक गटात दहा ते पंधरा स्पर्धक असल्यामुळे अव्वल सहा खेळाडू निवडताना परिक्षकांना बारकाईने निरीक्षण करावे लागले. ५५ किलो वजनी गटात ओंकार आंबोकर, संजय आंग्रे आणि इम्रान खान यांच्यात अव्वल स्थानासाठी चुरस झाली. त्यात आोंकार काकणभर सरस ठरला. ६० किलो वजनीगटात नितीन शिगवणने दिलदार हुसेन आणि महेश कांबळेचे कडवे आव्हान मोडीत काढले तर ६५ किलो वजनी गटातही जोरदार स्पर्धा पाहायला मिळाली. या गटात देवचंद गावडेने पहिला क्रमांक पटकावला.
७० किलो गटात नदीम अन्सारी तर ७५ किलो गटात मनोज कोरेने बाजी मारली. शेवटच्या गटात भास्कर कांबळीला माजी मुंबई श्री सचिन डोगरे आणि यंदाचा मुंबई श्रीचा उपविजेता सकिंदर सिंगला या स्पर्धेत दुसऱया स्थानावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेला खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर यांची उपस्थिती लाभली तर स्पर्धेचा पुरस्कार सोहळा आमदार सुनील प्रभू यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी संघटनेचे सरचिटणीस सुनील शेगडे, विजय झगडे, सुधाकर सुर्वे उपस्थित होते.
मुंबई महापौर श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचा निकाल
५५ किलो वजनीगट – १. ओंकार आंबोकर (बॉडी वर्पशॉप), २. संजय आंग्रे ( राहुल जिम), ३. इम्रान खान (विजय व्या.), ४. निलेश तावडे ( राहुल जिम), ५. शुभम खेडेकर (वक्रतुंड), ६. सुयश सावंत (एटू फिटनेस).
६० किलो वजनीगट – १. नितीन शिगवण (वक्रतुंड), २. दिलदार हुसेन (पंपिंग आर्यन), ३. महेश कांबळे (आर. के. फिटनेस), ४. आकाश तांबे (रॉनी फिटनेस), ५. साहिल पांचाळ ( एस्टीम जिम), ६. हृतिक जाधव (बॉडी रिन्यू).
६५ किलो वजनीगट – १. देवचंद गावडे (परब फिटनेस), २. बप्पन दास (आर.के.एम), ३. अरूण पाटील (जय भवानी), ४. समीर शेख (स्लिमवेल), ५. निलेश गिरी (आर.के.फिटनेस), ६. विनोद तेलंगडे(सम्राट जिम).
७० किलो वजनीगट – १. नदीम अन्सारी (सावरकर जिम), २. विशाल धावडे (बालमित्र), ३. जगदीश कावणकर (मारूती जिम), ४. संदेश सकपाळ (परब फिटनेस), ५. खुशाल सिंग (पंपिंग आर्यन), ६. नदीम शेख (सावरकर जिम).
७५ किलो वजनीगट – १. मनोज कोरे (बालमित्र जिम), २. अभिषेक खेडेकर (पंपिंग आर्यन), ३. लिलाधर म्हात्रे (कृष्णा जिम), ४ अमित साटम (बोवलेकर), ५. रवि पाटील (आर.के.एम.), ६. निलेश पांचाळ (एक्स्ट्रीम फिटनेस).
७५ किलोवरील वजनीगट – १. भास्कर कांबळी (ग्रेस फिटनेस), २. सकिंदर सिंग ( फॉर्च्युन फिटनेस), ३. सचिन डोंगरे (आर.के.एम), ४. अर्जुन कुंचीकुरवे (गुरूदत्त), ५. सलीम सय्यद (आर.के.एम फिटनेस), ६. प्रसाद वांजळे (बॉडी वर्पशॉप).
किताब विजेता- भास्कर कांबळी (ग्रेस फिटनेस)