भीष्मराज बाम,-क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ
‘‘मला मिळालेला ‘जीवनगौरव’ पुरस्कार म्हणजे क्रीडा मानसशास्त्र क्षेत्राचा गौरव आहे. बऱ्याच उशिरा का होईना राज्य शासनाला क्रीडा मानसशास्त्राचे महत्त्व कळले आहे. मात्र, मला अपेक्षित असलेल्या क्रीडा संस्कृतीचा ऱ्हास होत आहे, हीच खंत माझ्या मनात वारंवार येत आहे,’’ असे ज्येष्ठ क्रीडा मानसशास्त्रज्ञ डॉ. भीष्मराज बाम यांनी सांगितले.
डॉ. बाम यांना राज्य शासनातर्फे दिनांक ११ फेब्रुवारी रोजी ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. ऑलिम्पिक व अन्य आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये पदकांची लयलूट करणाऱ्या अनेक ऑलिम्पिक नेमबाजांना डॉ. बाम यांचे मार्गदर्शन लाभले आहे. जीवनगौरव पुरस्काराबाबत, तसेच सध्याच्या क्रीडा क्षेत्राविषयी डॉ. बाम यांनी  मनमोकळेपणाने गप्पागोष्टी केल्या.
जीवनगौरव पुरस्काराविषयी तुम्ही समाधानी आहात का?
कोणत्याही खेळाडू किंवा संघटकाला एखादा पुरस्कार दिल्यानंतर त्याचे समाजातील स्थान अधिक उंचावते. पुरस्कारार्थी व्यक्ती अधिकारवाणीने सल्ला देऊ शकते, मात्र एकाच वेळी तीन वर्षांचे हे पुरस्कार जाहीर झाल्यामुळे या पुरस्काराविषयीची अपेक्षेइतकी उंची वाढली गेली नाही. जीवनगौरवचे महत्त्व तीन व्यक्तींमध्ये विभागले गेले. अर्थात या पुरस्काराविषयी मी समाधानी आहे. या पुरस्कारामुळे क्रीडा मानसशास्त्रज्ञांचे महत्त्व शासनास कळले आहे ही आमच्या क्षेत्रासाठी आनंददायक गोष्ट आहे.
क्रीडा मानसशास्त्राविषयी अपेक्षेइतकी जाणीव खेळाडूंमध्ये आहे का?
अद्यापही शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीविषयी समाजात जागृती निर्माण झालेली नाही. परदेशात शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीला प्राधान्य दिले जाते. आपल्याकडे मात्र याबाबत उदासीनता दिसून येते. बलवान खेळाडूही कधी कधी नैराश्याला सामोरा जातो. विश्वविजेत्या खेळाडूंनाही कधी कधी ऑलिम्पिकसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये अंतिम फेरीत अशा नैराश्यापोटी पराभव स्वीकारावा लागला आहे.
शारीरिक तंदुरुस्तीबाबत आपल्याकडे अपेक्षेइतके महत्त्व दिले जाते का?
आपल्याकडे शारीरिक तंदुरुस्ती व खेळ यांची गल्लत केली जात आहे. शारीरिक तंदुरुस्ती म्हणजेच खेळ असा गैरसमज आहे. मात्र ही दोन्ही क्षेत्रे वेगळी आहेत. खेळातील यशाकरिता शारीरिक तंदुरुस्तीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. बारावी इयत्तेपर्यंत खेळ हा विषय सक्तीचा केला पाहिजे. सूर्यनमस्कार, योगासने आदी व्यायामप्रकार अनिवार्य केले पाहिजेत. हंगेरीत शाळा व महाविद्यालयांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती न राखणाऱ्यांना कडक शिक्षा केली जाते.
विविध खेळांसाठी परदेशी प्रशिक्षक नेमले जातात, त्या विषयी तुमचे काय मत आहे?
खेळातील प्रगत ज्ञानाकरिता परदेशी प्रशिक्षक अनिवार्य आहेत, मात्र जर एकाच वेळी तीस-चाळीस खेळाडूंकरिता एक-दोन परदेशी प्रशिक्षक खरोखरीच पुरेसे पडतात काय, याचा विचार संघटकांनी केला पाहिजे. पाच-सहा खेळाडूंमागे एक प्रशिक्षक असला पाहिजे. तसेच या परदेशी प्रशिक्षकांना साहाय्यक प्रशिक्षकही दिला पाहिजे. परदेशी प्रशिक्षकाने शिकविलेल्या ज्ञानाचा पाठपुरावा करून घेण्यासाठी साहाय्यक प्रशिक्षकाची आवश्यकता असते.
शिवछत्रपती पुरस्काराबाबत तुम्हाला काय वाटते?
खेळाडू किंवा प्रशिक्षकांचा सन्मान करण्यासाठी हे पुरस्कार उचित आहेत, मात्र त्याचा नियमितपणा राखला पाहिजे. दरवर्षी हे पुरस्कार दिले गेले पाहिजेत. तसेच या पुरस्काराबाबत असलेली किचकट नियमावली बदलली गेली पाहिजे. सर्व खेळाडूंना समजेल अशी नियमावली पाहिजे. तसेच, पुरस्कारांबाबत कागदपत्रे देताना खेळाडूंचा वेळ वाया जाणार नाही याचीही जाणीव शासनास पाहिजे. एखाद्या खेळाडूला आपल्या राज्यात अपेक्षेइतकी चांगल्या सुविधांची नोकरी मिळत नसेल व अशा खेळाडूने रेल्वे किंवा अन्य आस्थापनात नोकरी स्वीकारली म्हणजे तो महाराष्ट्राचा खेळाडू नाही, असा समज करून घेणे अतिशय दुर्दैवाचे आहे.
आपल्या राज्यात पुरेसे प्रशिक्षक आहेत काय?
आपल्याकडे अव्वल दर्जाचे १५ ते २० हजार प्रशिक्षक आहेत. अद्ययावत प्रशिक्षण घेण्यासाठी अशा प्रशिक्षकांना पतियाळा येथे जावे लागते. आपल्या राज्यात पतियाळा येथील राष्ट्रीय क्रीडा संस्थेसारखी संस्था उभारण्याची आवश्यकता आहे. खेळाचा विकास होण्यासाठी केवळ क्रीडा संकुले उभारली म्हणजे विकास झाला असे होत नाही. जर एखाद्या संकुलाकरिता २५ कोटी रुपये खर्च होत असेल तर त्याच्या देखभालीसाठी दर वर्षी तीन ते पाच कोटी रुपये, खेळाडू व प्रशिक्षकांकरिता दोन-तीन कोटी रुपये खर्च करण्याची आवश्यकता आहे.
राज्य व देशातील क्रीडा क्षेत्राविषयी तुम्हाला काय वाटते?
सुविधा निर्माण झाल्या तरी देशात क्रीडा संस्कृतीचा ऱ्हास होत आहे. आपण केवळ क्रिकेटवर अधिकाधिक पैसा खर्च करतो. या खेळाला अपेक्षेपेक्षा जास्तच प्रसिद्धी दिली जाते. सामाजिक विषमता दूर करण्यासाठी खेळ हे सर्वोत्तम माध्यम आहे हे लक्षात घेतले पाहिजे. क्रीडा संस्कृती जोपासण्यासाठी खेळाडू, पालक, संघटक, प्रशिक्षक, शासन, प्रसार माध्यमे अशा सर्वानी एकत्र आले पाहिजे.

Story img Loader