भारताचा अनुभवी टेनिसपटू महेश भूपती आणि त्याचा कॅनडाचा साथीदार डॅनियल नेस्टर यांचे चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. रशियाच्या रावीन लासेन आणि अमेरिकेच्या निकोलस मॉनरो या बिगरमानांकित जोडीने ६-४, ७-५ असे नमवले.
जेतेपदासाठी प्रमुख दावेदार असणाऱ्या असणाऱ्या भूपती-नेस्टर जोडीला अवघ्या ७५ मिनिटांत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. लासेन आणि मॉनरो जोडीने पहिला सेट सहजपणे नावावर केला. दुसऱ्या सेटमध्ये ०-३ने पिछाडीवर पडलेल्या या जोडीने त्यानंतर पुनरागमन करत सामन्यावर कब्जा केला. दरम्यान डेव्हिस चषकाच्या संयोजनाबाबत बदल सुचवून बंडाचा झेंडा फडकावणारा भारताचा युवा टेनिसपटू सोमदेव देववर्मनला चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेत पराभवाला सामोरे जावे लागले. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या टॉमस बर्डीचने सोमदेवचा ६-३, ६-१ असा धुव्वा उडवत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली.
दोन वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या मारिन चिलिचने संघर्षमय विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. ‘वाईल्ड कार्ड’द्वारे स्पर्धेत प्रवेश मिळालेल्या सोमदेवला आपल्या दुहेरी चुकांवर नियंत्रण राखता आले नाही आणि ६५ मिनिटांतच त्याचे आव्हान संपुष्टात आले. परतीच्या फटक्यांतही सोमदेव पिछाडीवर पडला. प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद असतानाही सोमदेव आपल्या क्षमतेनुसार खेळ करू शकला नाही. दुसरीकडे बर्डीचने मात्र सावधपणे सुरुवात केली. मात्र त्यानंतर खेळावर संपूर्ण वर्चस्व गाजवत विजय मिळवला. पुढील फेरीत त्याचा मुकाबला स्पेनच्या ऑगस्टो बॉटिस्टा याच्याशी होणार आहे.
अन्य लढतींमध्ये एक सेट गमावल्यानंतरही क्रोएशियाच्या मारिन चिलिचने युक्रेनच्या सर्जिय स्टाखोव्हस्कीवर ४-६, ६-२, ६-२ अशी मात केली. फ्रान्सच्या बेनाइट पेअरने इस्त्रायलच्या डय़ुडी सेलाचा ६-१, ६-० असा धुव्वा उडवला. जपानच्या गो सोएडासमोर द्वितीय मानांकित जॅन्को टिप्सारेव्हिचचे तगडे आव्हान असणार आहे. गतविजेता स्टॅनिलॉस वॉरविन्काची लढत अलिइज बेडानेशी होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा