महेश भूपती आणि रोहन बोपण्णा जोडीने माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. मात्र लिएण्डर पेस आणि सानिया मिर्झा यांना आपापल्या साथीदारांसह खेळताना पराभवाला सामोरे जावे लागले. सहाव्या मानांकित भूपती-बोपण्णा जोडीने संघर्षपूर्ण लढतीत अर्जेटिनाच्या ज्युआन मोनॅको आणि होरासिओ झेबालोस जोडीवर ६-३, ३-६, १०-५ असा विजय मिळवला. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेची स्पर्धा रंगीत तालीम असे या स्पध्रेचे महत्त्व आहे. या पाश्र्वभूमीवर भूपती-बोपण्णा जोडीने अंतिम आठमध्ये प्रवेश करत आपली दावेदारी स्पष्ट केली आहे.
या जोडीने आपल्या सव्‍‌र्हिसवर भर दिल्याचे दिसून आले. प्रतिस्पर्धी जोडीच्या तुलनेत पहिल्या सव्‍‌र्हिसद्वारे भूपती-बोपण्णा जोडीने ७६ टक्के गुणांची कमाई केली. दुसऱ्यांदा सव्‍‌र्हिस करतानाही या जोडीचे प्रदर्शन चांगले झाले. प्रतिस्पर्धी जोडीच्या ५० टक्क्यांच्या तुलनेत भूपती-बोपण्णा जोडीने दुसऱ्या सव्‍‌र्हिसद्वारे ६७ टक्के गुण मिळवले. भूपती-बोपण्णा जोडीने प्रतिस्पर्धी जोडीच्या ५३ गुणांच्या तुलनेत ६० गुण मिळवत सामन्यावर कब्जा केला.
अनुभवी खेळाडू लिएण्डर पेसला ऑस्ट्रियन साथीदार जुर्गेन मेल्झरच्या साथीने खेळताना पराभवाला सामोरे जावे लागले. जर्मनीच्या टॉमी हास आणि चेक प्रजासत्ताकच्या राडेक स्टेपानेक जोडीने पेस-मेल्झर जोडीला ७-५, ६-१ असे नमवले. पेस-मेल्झर जोडीची सव्‍‌र्हिस चार वेळा भेदण्यात हास-स्टेपानेक जोडीने यश मिळवले.
महिलांमध्ये सानिया आणि तिची अमेरिकन साथीदार बेथानी मॅटेक-सॅण्ड्स जोडीला अ‍ॅनास्तासिया पॅव्हल्युचेनकोव्हा-ल्युसी साफ्रोव्हा या जोडीने पराभूत केले. अ‍ॅनास्तासिया आणि ल्युसी यांनी हा सामना ७-५, ६-१ अशा फरकाने जिंकला.

Story img Loader