महेश भूपती आणि रोहन बोपण्णा जोडीने लिएण्डर पेस-रॅडीक स्टेपानेक जोडीवर मात करत वर्ल्ड टूर फायनल टेनिस स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली. वर्षअखेरीस होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील चुरशीच्या उपांत्य मुकाबल्यात सुपर टायब्रेकरद्वारे भूपती-बोपण्णा जोडीने मॅचपॉइंट वाचवला आणि सनसनाटी विजय नोंदवला. या जोडीने ४-६, ६-१, १२-१० असा विजय मिळवला.
पेस-स्टेपानेकवरील विजयासह भूपती-बोपण्णाने शांघाय मास्टर्स स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढला. लंडन ऑलिम्पिकमध्ये पेससह खेळण्यास या दोघांनी नकार दिला होता. ऑलिम्पिकमध्ये प्राथमिक फेरीतच गाशा गुंडाळावा लागल्यानंतर भूपती-बोपण्णा जोडीवरील दबाव वाढला होता. मात्र त्यानंतर सातत्यपूर्ण खेळ करत त्यांनी वर्ल्ड टूर फायनल स्पर्धेत स्थान निश्चित केले. उपांत्य फेरीत पेस-स्टेपानेक या अनुभवी जोडीला धूळ चारत त्यांनी अंतिम फेरीत जागा पटकावली. या पराभवामुळे तीन सामन्यांत तीन विजय मिळवणाऱ्या पेस-स्टेपानेक जोडीला रिक्त हस्तेच परतावे लागणार आहे. अंतिम फेरीत विजयासह वर्ल्ड टूर फायनल स्पर्धेचे जेतेपद कमावण्याची भूपती-बोपण्णाला ऐतिहासिक संधी आहे. १९७७मध्ये विजय अमृतराजने या स्पर्धेचे जेतेपद पटकावल्यानंतर कोणत्याही भारतीय खेळाडूला हे जेतेपद मिळवता आलेले नाही.

Story img Loader