सुपर फोर फेरीत भारत आणि अफगाणिस्तामध्ये झालेला सामना आशिया चषक स्पर्धेतील सर्वात रंगतदार सामना ठरला. भारत अफगाणिस्तानचे २५३ धावांचे लक्ष्य सहज पार करेल असे अनेकांना वाटले होते. पण अफगाणिस्तानने सरस खेळ करुन भारताला २५२ धावांवर रोखले आणि सामना बरोबरीत सुटला. त्यावेळी भारतीय संघाला जितके वाईट वाटले असेल त्यापेक्षा जास्त दु:ख स्टेडियममध्ये उपस्थित एका लहानग्या चाहत्याला झाले. त्याला आपले अश्रू आवरता आले नाहीत. त्याचे वडिल त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते.

पण त्याला आपले अश्रू रोखता येत नव्हते. स्टेडियममधील कॅमेऱ्यांनी हे दृश्य टिपले. रडणाऱ्या मुलाचा तो फोटो पाहून अनेकांचे मन हेलावले. ऑफ स्पिनर हरभजन सिंगने या मुलाचा फोटो टि्वट करुन त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. रडू नकोस, फायनल आपणच जिंकू असे त्याने टि्वटमध्ये म्हटले होते.
हरभजन सिंगच्या टि्वटला त्या मुलाचे वडिल अमरप्रीत सिंग यांनी प्रतिसाद देताना पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले. त्याचवेळी त्यांनी भुवनेश्वर कुमारने फोन करुन अरजानची समजूत घातल्याची माहिती दिली. ‘पाजी अरजान आता आनंदात असून शुक्रवारी होणाऱ्या फायनलकडे त्याचं लक्ष लागल आहे.

भुवनेश्वर कुमारने स्वत: फोनवरुन त्याची समजूत घातली. शुक्रवारी आपणच फायनल जिंकू असे अमरप्रीत यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे. अरजानला फक्त भुवनेश्वर कुमारनेच फोन केला नाही तर त्या दिवशी अफगाणिस्तानचे खेळाडू राशिद खान आणि मोहम्मद शहझाद यांनी त्याच्यासोबत फोटो काढून त्याला आनंद दिला.

Story img Loader