भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला टी-२० क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा सल्ला देणाऱ्यांचा भारताचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने चांगलाच समाचार घेतला. न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा टी-२० सामना धोनीच्या संथ फलंदाजीमुळे भारताला गमावावा लागल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या. त्यामुळेच धोनीने टी-२० क्रिकेटमधून निवृत्त व्हावे, असं नेटकऱ्यांपासून ते माजी खेळाडू म्हणू लागले आहेत. मात्र, या सर्व प्रकरणावर भारतीय संघातील एखाद्या खेळाडून उघडपणे वक्तव्य करत धोनीची बाजू घेतली आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर धोनीनं टी-२० क्रिकेटबद्दल फेरविचार करण्याची गरज असून टी-२० मध्ये त्याने युवा खेळाडूंना संधी द्यावी असे मत व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने व्यक्त केले होते. थिरुअनंतपुरम येथे सामन्यापुर्वीच्या सरावानंतर सोमवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये भुवनेश्वर कुमारने यासंदर्भात आपले मत व्यक्त केले. ‘जे लोक धोनीच्या कामगिरीवर टीका करत आहेत त्यांनी स्वत:च्या कामगिरीची आकडेवारी तपासायला हवी’, असा खोचक टोमणाच त्याने कोणाचेही नाव न घेता लगावला आहे. धोनी एक महान खेळाडू असून त्याच्या खेळाबद्दल आणि क्षमतेबद्दल सध्याच्या संघातील कोणत्याच खेळाडूला काहीच शंका नसल्याचेही भुवनेश्वरने स्पष्ट केले आहे.

पाहा काय म्हणाला आहे भुवनेश्वर


भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातली टी-२० सामन्यांची मालिका १-१ अशा बरोबरीत आहे. त्यामुळे आज तिरुअनंतपुरमच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यात नेमका कोणता संघ बाजी मारेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तिरुअनंतपुरम शहरात नव्याने बांधण्यात आलेल्या, ग्रिनफील्ड मैदानातला हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना सायंकाळी सात वाजता खेळवण्यात येणार आहे. मात्र, या सामन्यावर पावसाचं सावट असल्याने भारतीय चाहत्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

Story img Loader