भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने मार्चमध्ये इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत शानदार प्रदर्शन केले. या प्रदर्शनासाठी आयसीसीने त्याची मार्च महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड केली आहे. भुवीने इंग्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 4.65च्या सरासरीने 6 गडी बाद केले, तर पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत त्याने 4 विकेट घेतल्या.

 

भुवनेश्वर कुमारने आयसीसीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, की दीर्घ आणि वेदनादायक विश्रांतीनंतर पुन्हा भारताकडून खेळताना आनंद झाला. यावेळी मी माझी तंदुरुस्ती आणि तंत्रावर बरेच काम केले. भारतासाठी बळी मिळवल्यामुळे चांगले वाटले. या प्रवासामध्ये माझी साथ दिलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मला आभार मानायचे आहेत. मार्च महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून मला निवडण्यासाठी मतदान केलेल्या सर्व चाहत्यांचे विशेष आभार.

भुवनेश्वर हा पुरस्कार मिळवणारा सलग तिसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला. ऋषभ पंतने जानेवारीत हा पुरस्कार जिंकला होता. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विनने हा पुरस्कार जिंकला. भुवनेश्वरशिवाय अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खान आणि झिम्बाब्वेच्या सीन विल्यम्ससुद्धा या शर्यतीत होते.

भारताचा माजी फलंदाज आणि आयसीसी व्होटिंग अ‍ॅकॅडमीचा सदस्य व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाला, “दुखापतीमुळे भुवी जवळपास दीड वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकला नाही. त्याने शानदार पुनरागमन केले आणि पॉवरप्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये इंग्लंडच्या आक्रमक फलंदाजांसमोर चांगली कामगिरी करत भारताच्या विजयाचा पाया रचला.”

महिलांमध्ये लिझेल लीचा सन्मान

 

महिला गटात दक्षिण आफ्रिकेच्या लिझेल लीने मार्च महिन्यातीलु पुरस्कार जिंकला आहे. लीने भारताविरुद्धच्या चार एकदिवसीय सामन्यात एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावून महिलांच्या फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान गाठले. ली म्हणाली, ”मला या पुरस्कारासाठी निवडण्यात आले याचा मला आनंद आहे.” .